Tue, May 21, 2019 00:50होमपेज › Pune › मुलाचा हक्‍क सोडून दिला घटस्फोट

मुलाचा हक्‍क सोडून दिला घटस्फोट

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:09AMपुणे : महेंद्र कांबळे

दुसरा संसार थाटण्यासाठी पत्नीला घटस्फोट मागणार्‍या पतीला न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. परंतु, मुलाचा हक्‍क सोडून पत्नीला 14 लाख रूपये कायमस्वरूपी पोटगी आणि सदनिकेचा ताबा देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

दोघेही उच्चशिक्षीत असून पती (अजय नाव बदललेले) हा नोकरदार आहे. 2007 ला विवाह झाल्यानंतर संसाराची गाडी व्यवस्थित रूळावर चालली होती. परंतु, अचानक दोघांच्या स्वभावांमधील काही मतभेदांमुळे त्याच्यांत छोट्या छोट्या कारणामुळे वाद होऊ लागले. हे वाद सुरू असतानाच तिने (रेखा नाव बदललेले) एका मुलाला जन्म दिला. मुलगा सहा महिन्यांचा झाला असताना अजय मुलासह पत्नीला सोडून गेला. याच काळात तिने आई आणि वडील या दोघांची जबाबदारी पार पाडताना तिने मुलाचे संगोपन केले. 2015 त्याने पत्नी विरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला.

त्यानंतर तिने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला. न्यायालयाने या दरम्यान तिच्या आणि मुलाच्या संगोपनासाठी पोटगी मंजूर केली. पोटगीचा न्यायालयाचा आदेश झाला असतानाही त्याने पोटगी भरण्यास टाळाटाळ केली. या विरोधात न्यायालयाने त्याला वॉरंटदेखील बजावले. त्यानंतर दोघांमध्ये तडजोडीची बोलणी सुरू झाली. दोघांचा संयुक्‍त फ्लॅट होता. त्यातील 75 टक्के रक्‍कम रेखाच्या आई-वडिलांनी दिली होती. तसेच 20 टक्के रक्‍कम अजयने दिली होती. 

समुपदेशनानंतरही दोघेही एकत्र येण्याचे वातावरण निर्माण न झाल्याने शेवटी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोहचले. दोघांनीही एकमेकांवर केलेले आरोप मागे घेण्याच्या अटीवर घटस्फोटास मंजुरी मिळाली. परंतु, मंजुरी देताना तिने मुलावर कोणताही हक्‍क भविष्यात दाखवायचा नाही, फ्लॅटचा हक्‍क सोडल्याचे पत्र अजयने द्यायचे तसेच 14 लाख रूपयांची कायम स्वरूपी पोटगी देण्याचे पतीने मान्य केले. समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे दोघांनाही स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे.