Sun, Jul 21, 2019 15:01
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › दुष्काळी स्थितीकडे जिल्ह्याची वाटचाल

दुष्काळी स्थितीकडे जिल्ह्याची वाटचाल

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 10:50PMसुहास जगताप :

भयावह दुष्काळी स्थितीकडे पुणे जिल्ह्याची वाटचाल सुरू झालेली आहे. जिल्ह्याच्या बर्‍याच मोठ्या भागात पाऊस झालेला नाही. पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने झाले तरी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.  जिल्ह्याच्या काही भागात येणार्‍या रिमझिम पावसाने आहे त्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने ती पिके हातची जात आहेत;  तर दुसरीकडे काही भागात पाऊसच नसल्याने संपूर्ण शेतजमीन ओसाड पडलेली आहे.  यावरून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी निसर्गाच्या गर्तेत सापडला आहे. शासनाची भूमिकाही शेतकर्‍यांबाबत दुटप्पी असल्याने ‘आई खाऊ घालेना;  बाप भीक मागू देईना’ अशी स्थिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आहे.  

जिल्ह्यातील धरणे जवळपास भरत आली असली; तरी क्षेत्रीय पातळीवर पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.  धरणे असलेला मावळ आणि खडकवासला साखळीचा म्हणजेच डोंगरदर्‍यातील भाग सोडला तर पाऊस गायब आहे. परिणमी पिके जळू लागली आहेत.  अनेक ठिकाणी भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होऊ लागली आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भाागातील सोनवडी सुपे येथे तर महिलांनी टॅँकरच्या मागणीसाठी मोर्चा माढला होता.  धरणे शंभर टक्के भरली नसली तरी 80 ते 85 टक्के भरल्याने पाणी पातळी नियंत्रणात राखण्यासाठी कालवा,  नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने त्याचा लाभ मिळणार्‍या भागाला सध्या थोडासा दिलासा मिळाला आहे; परंतु जेथे पावसाच्या पाण्यावरच तळी,  तलाव,  बंधारे,  नाले भरल्यानंतर विहिरींना पाणी येते,  पावसाच्या पाण्यावरच पाऊसकाळात पिके जगतात अशा मोठ्या भागातील स्थिती भयावह आहे.  पिकांनी माना टाकल्या आहेत.  चाराटंचाई जाणवू लागली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.  खेड तालुक्यात बटाटा पिकांनी माना टाकल्या आहेत.  दौंड,  बारामती तालुक्यात उसाच्या लागवडीत घट झाली आहे. विहिरींना पाणी नसल्याने केवळ कालव्याच्या भरवशावर ऊस लागवडीचे धाडस शेतकरी करेनात. ढगाळ वातावरण,  प्रचंड वारे,  रिमझिम- कधीतरी पडणारा पाऊस यामुळे रोगराई वाढली आहे. चिलटे वाढली आहेत.  थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. एकंदरीत पावसाअभावी ग्रामीण भागात स्थिती भयावह होऊ लागली आहे. आगामी दीड महिन्यात पावसाने आपली सरासरी भरून काढली नाही तर मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागेल. 

दौंड आणि बारामतीचा जिरायती भाग पाण्याविना होरपळत चालला आहे.  नदी,  नाले,  ओढे,  बंधारे कोरडेठाक पडले आहेत.  अनेक शेतकर्‍यांनी केलेली बाजरी,  मका ही पिके उगवलीच नाहीत; तर शेकडो एकर शेती  हे पेरणीविना पडून आहे.  या भागात उसाचे मोठे क्षेत्र आहे.  या उसाला सिंचनाद्वारे पाणी शेतकरी देत आहेत;  मात्र उसाची वाढ ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.  परिणामी या भागातील उसाची वाढ खुंटली आहे.  यापेक्षा वाईट स्थिती इंदापूर तालुक्यात आहे. इंदापूर तालुक्यातील बर्‍याच शेतकर्‍यांनी उसासोबतच डाळिंब बागा लावण्याला प्राधान्य दिले.  गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालावधीत या शेतकर्‍यांनी डाळिंबांच्या भरवशावर बर्‍यापैकी उत्पन्न मिळविले; मात्र काही दिवसांपासून या डाळिंब बागांवर मर,  तेल्या व अन्य रोगांनी मारा केला असून, अनेक उपाय करूनही यावर तोडगा निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी डाळिंब बागा उखडून टाकणे सुरू केले आहे.   

जिल्ह्याच्या दक्षिण भागात ही स्थिती असताना उत्तर भागातही काही वेगळी स्थिती नाही.  या भागात पाऊसमान बरे आहे;  मात्र दररोजच्या रिमझिम पावसाने पालेभाज्या व फळभाज्यांवर रोगाचे आक्रमण होण्याची शक्यता आहे.  यासोबतच टोमॅटो पिकाचा बाजारभाव प्रचंड कोसळला आहे. या पिकांसाठी झालेला खर्चही निघण्याची शक्यता नाही; तर कोथिंबीर,  शेपू याची जुडी केवळ एक रुपयाला मिळत आहे.  यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.  यावर मात करण्यासाठी शासनाकडे काहीही धोरण नसल्याची ओरड त्यांच्याकडून होत आहे. 

आरक्षणासाठी आंदोलने जोरात

मराठा,  धनगर समाज आरक्षणाचा जोर कायम आहे.  मराठा आरक्षण  मागणीसाठी  9 ऑगस्टला झालेला ‘बंद’ अत्यंत कडकडीत झाला.  वाडी-वस्ती,  छोटी-छोटी गावे या ठिकाणीही ‘बंद’ पाळण्यात आला.  चाकणला झालेल्या हिंसक आंदोलनामुळे पोलिसांनी अत्यंत काळजी घेतल्याने या ‘बंद’ला कोठेही गालबोट लागले नाही.  या ‘बंद’ला मिळालेला प्रतिसादही जर सरकारपर्यंत पोहोचला नाही तर हे आंदोलन भडकण्याची शक्यता आहे.  धनगर समाजानेही आपली आंदोलनाची धार वाढवली आहे.  सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  याच वेळी काही भागात ‘बंद’ही पुकारण्यात आला होता.  थोडक्यात मराठा,  धनगर समाज आरक्षण आंदोलनाची धग जिल्ह्यात कायम आहे.  या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा ताण यंत्रणेवर येत आहे. 

अजित पवारांच्या आंदोलनाची चर्चा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरासमोर झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारच सामील झाल्याने अजित पवार यांच्या या कृतीची जिल्ह्यात सर्वत्र मोठी चर्चा आहे. अजित पवार यांनीच आंदोलकांमध्ये येऊन शरद पवार यांच्या घरासमोर घोषणा देणे अनेकांना रुचलेले नाही.  अजित पवार यांची भावना कितीही चांगली असली तरी एकतर यामुळे आजपर्यंत पक्षविरहित राहिलेल्या मराठा आंदोलनाला पक्षीय रंग येण्याचा धोका यामुळे वाढला आहे; तसेच यामुळे या आंदोलनाची एकप्रकारे खिल्ली उडविण्यात आली,  अशीही चर्चा सुरू झाली आहे.