Tue, Apr 23, 2019 23:31होमपेज › Pune › जिल्हा बंद रद्द; धनगर समाजाचे निवेदन

जिल्हा बंद रद्द; धनगर समाजाचे निवेदन

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:18AMभिगवण : प्रतिनिधी

बंद ठेऊन सामान्यांना होत असलेला नाहक त्रास लक्षात घेत धनगर समाजाच्या वतीने भिगवण बंद न ठेवता आरक्षण मिळण्याच्या मागणीचे निवेदन शासनस्तरावर देत सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.

सोमवारी (दि. 13) धनगर आरक्षणावरून राज्य बंदचे मेसेज सोशल मीडियावर सर्वत्र फिरत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र रविवारी (दि. 12) भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने बंदच्या पार्श्‍वभूमीवर धनगर समाजातील पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. 

यामध्ये सर्वानुमते बंदला विरोध करण्यात आला.सततच्या बंदमुळे सामान्य नागरिकांना जेवढा त्रास होतो तेवढाच व्यापारी वर्गालाही होतो, तसेच बंदच्या काळात हिंसक व अनुचित घटना घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा सारासार विचार व्यक्त करीत धनगर समाजाच्या पदाधिकार्‍यांनी भिगवण बंद न ठेवण्याचा निर्धार केला. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर तसेच संपत बंडगर, तुकाराम बंडगर, आबासाहेब देवकाते, आबासाहेब बंडगर, अण्णा धवडे, तेजस देवकाते, धनंजय थोरात, सतीश शिंगाडे, अ‍ॅड. महेश देवकाते, कुंडलिक बंडगर, महेश शेंडगे, सतिश शेळके, अमोल देवकाते आदी जण मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

त्यामुळे भिगवणमधील सर्व व्यवहार सोमवारी (दि. 13) सुरळीत सुरू होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास मदनवाडी चौकात धनगर समाजाच्या पदाधिकार्‍यांनी भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलकंठ राठोड यांना निवेदन सादर केले. यामध्ये धनगर समाजाला स्वातंत्र्यकाळापासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्याने लवकरात लवकर आरक्षण देण्याबाबत मागणी करण्यात आली. 

वरवंड येथे बंद

यवत : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ वरवंड गावात ‘बंद’ पाळण्यात आला होता. सोमवारी सकाळपासूनच वरवंड गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून धनगर समाजाच्या ‘बंद’ला पाठिंबा देण्यात आला.  रॅली गावात  दाखल होताच शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. साधारणपणे दुपारी 12 वाजेनंतर गावातील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली.

केडगाव, चौफुला परिसरात व्यवहार बंद

केडगाव : आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ या घोषणा देत केडगाव आणि चौफुला परिसरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. धनगर समाज दौंड तालुका यांच्या वतीने बंद आंदोलनाचे सोमवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले होते. त्या आवाहनाला नागरिकांनी व्यापार्‍यांनी बंद ठेवून प्रतिसाद दिला. सकाळी धनगर बांधवानी केडगाव, चौफुला आणि वरवंड येथे मोटारसायकल रॅली काढून सभा घेतली.