Fri, Apr 26, 2019 18:09होमपेज › Pune › खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना दणका

खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना दणका

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:39AMपुणे : देवेंद्र जैन

शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात गोवल्यामुळे विभागीय पोलिस प्राधिकरणाने खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव व सहायक पोलिस निरीक्षक एम. आर. घुगे यांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढल्यामुळे पुणे पोलिस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.

शाह यांच्यावर पोलिसांनी अन्याय केल्यामुळे त्यांनी याबाबत  राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहसचिव, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त कार्यालयात मोठा पत्रव्यवहार केला व मंत्रालयात, महासंचालक कार्यालयात व पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात खेटा मारल्या. दरम्यान, राज्य सरकारने पोलिसांच्या विरोधात तक्रारीकरिता विभागीय पोलिस प्राधिकरण सुरू केले. त्यानुसार शाह यांनी जाधव व घुगे यांच्याविरोधात जानेवारी 2017 मध्ये तक्रार दाखल केली. त्यावर सुनावणी घेण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त पोलिस अधिकारी आर. पी. जोशी व सदस्य माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त चंद्रकांत कुंभार व पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त बी. जी. गायकर यांच्यासमोर सहा महिने या प्रकरणी चाललेल्या सुनावणीनंतर प्राधिकरणाने 18 एप्रिल 2018 रोजी 17 पानी निकाल दिला. त्यात प्राधिकरणाने पोलिसांच्या अरेरावी वृत्तीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

प्राधिकरण सदस्यांनी आपल्या निकालपत्रात पोलिस खात्याची पूर्ण अब्रूच काढली आहे. त्यामध्ये शहा यांच्या अटकेची कृती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे रघुनाथ जाधव यांना माहीत असतानासुद्धा त्यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे; तसेच संपूर्ण प्रकरणात जाधव व घुगे हे दोषी आहेत, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या निकालाची प्रत त्यांच्यावर कारवाईकरिता संबंधित पोलिस आयुक्तांना दिली जाईल व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

याबाबतच्या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी की, अरविंद रसिकलाल शाह (वय 57) रा. मार्केट यार्ड, पुणे यांनी त्यांच्याविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याबाबत न्यायालयात व विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणात दाद मागितली होती. यावर शिवाजीनगर येथील सेशन्स कोर्टाने 6 डिसेंबर 2017 रोजी निकाल देऊन, शाह यांच्यावरील आरोपांचे खंडन करून त्यांना यातून मुक्त केले होते. पण शाह यांना झालेल्या त्रासापोटी त्यांनी प्राधिकरणात या निकालाचा संदर्भ देऊन जाधव व घुगे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.  
शाह हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या व्यवहारातील बाकी असलेल्या अंदाजे 4 कोटी पंचवीस हजार रुपये रकमेपोटी 30 मार्च 2015 रोजी प्रबोध अर्थ संचय प्रा. लि.च्या रामचंद्र सदाशिव डिंबळे यांना कायदेशीर नोटीस दिली होती. सदर नोटीस ही खंडणीची मागणी असल्याची तक्रार डिंबळे यांनी त्या वेळचे खडक पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांचेकडे केली. तसेच न्यायालयात 156/3 अंतर्गत खाजगी दावा दाखल केला. न्यालयाने डिंबळेंची तक्रार फेटाळून लावली. असे असतानाही जाधव यांनी डिंबळेंची तक्रार मान्य करून, शहा यांच्याविरोधात कलम 385 व 506 प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश देत, सदर तपास घुगे यांना करण्यास सांगितले. त्यानंतर घुगे यांनी शाह यांना लागलीच अटक केली.

शाह यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसताना जाधव व घुगे यांनी न्यायालयात शाह यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले. तसेच न्यायाधीशांना सदर तक्रारीबाबत, प्रथम वर्ग न्यायालयाने अगोदरच हा दावा फेटाळल्याचे न्यायालयाला सांगितले नाही. न्यायाधीश जहागीरदार यांनी त्यांच्यासमोर शाह यांनी मांडलेले सर्व पुरावे ग्राह्य धरून त्यांची दोषातून मुक्तता केली होती.

राज्य सरकारने सुरू केलेल्या या विभागीय पोलिस प्राधिकरणाचा हा पहिलाच निकाल आहे. सदर निकालामुळे सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील व न्यायव्यवस्थेवरील विश्वास नक्कीच उंचावेल. सामान्य नागरिकांवर पोलिस करत असलेल्या खोट्या कारवाया, या निकालानंतर बंद होण्यास सुरुवात होईल. खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळेपासून मी व माझा परिवार खूपच मानसिक यातना भोगत आहे. या प्रकरणात माझी बदनामी झाली, पण आता मी गप्प बसणार नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका  दाखल करणार आहे, असे शाह यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.