Thu, Jun 27, 2019 09:59होमपेज › Pune › राष्ट्रीयीकृत बँकांकडून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला

राष्ट्रीयीकृत बँकांकडून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:55AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या विविध सेवांसाठी शुल्क आकारणी सुरू केली आहे. एसएमएस चार्जेस, जीएसटी, एमआयएससी चार्जेस अशा विविध प्रकारच्या चार्जेसद्वारा या बँका ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. दुसरीकडे या बँका त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा देत नसल्याने ग्राहक अस्वस्थ आहेत.खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली अन् बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध लादले तेव्हाच बँक या शब्दाची व्याख्या मोडीत निघाली.  स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाहीत, रोजचा खर्च भागविण्यासाठी हातात पैसे नाहीत या अगतिकतेतून सर्वसामान्यांना जावे लागले. बँकांच्या रांगेत उभे असताना अनेक ग्राहकांचा मृत्यू झाला.

नोटबंदी बँक कर्मचार्‍यांच्या जिवावरही बेतली बँकेतील गर्दी, ग्राहकांशी वाद, कामाचा ताण यामुळे अनेक बँक कर्मचार्‍यांनाही प्राण गमवावे लागले दुसरीकडे नोटबंदीच्या काळात पाचशे, हजारच्या नोटा भरण्यासाठी व बदलण्यासाठी बँकांमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असलेली अपुरी जागा, साधी पिण्याच्या पाण्याची नसलेली सोय, अकार्यक्षम कर्मचारी वर्ग, मागासलेली यंत्रणा यामुळे या बँकांच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजही अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचा कारभार जुनाट पद्धतीने सुरू आहे. काही बँकांनी पैसे भरणा करण्यासाठी तसेच पासबुक प्रिंटिंगसाठी मशिन्स बसविल्या आहेत,  पण त्यांच्या देखभालीकडे लक्ष नसल्याने अनेकदा त्या बंद असतात. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अनेक आस्थापनांमधील कर्मचार्‍यांचे पगार जमा होतात.  

त्या ग्राहकांची पगाराच्या दिवसात गर्दी असते. सेवानिवृत्ती धारक, शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड संलग्न करण्याचे आदेश असल्याने या बँकांमध्ये गर्दी वाढत आहे.  वाढत्या ग्राहक संख्येच्या प्रमाणात या बँकांमध्ये उभे राहण्यासाठी तसेच गर्दी झाल्यास बसण्यासाठी शेडचीही व्यवस्था नाही एवढी अव्यवस्था असताना राष्ट्रीयीकृत बँका बँक ग्राहकांवर सेवा शुल्क लादून ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत.

Tags : Pimpri, Dissatisfaction, customers, money,  nationalized, banks