Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Pune › ‘पद्मावत’ विरोधासाठी  वाहनांची तोडफोड

‘पद्मावत’ विरोधासाठी  वाहनांची तोडफोड

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:47AMपुणे :

पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेकडून देशभरात आंदोलन सुरू असताना शहरातील वडगाव पुलानजीक मंगळवारी रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी वीस ते पंचवीस जणांच्या टोेळक्याने दहा ते बारा वाहनांची तोडफोड करत वाहनांच्या चाकांची हवा सोडून दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केला असून पंधरा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.   तर इतर संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून याप्रकरणात वापरलेले झेंडे, लाकडी काठ्या, स्टीलचा रॉड, दोन दुचाकी अशा वस्तूही जप्त केल्या आहेत.  

याप्रकरणी महेश लक्ष्मण भापकर (30, डोंबिवली पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे.  सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक येथे मुंबई-बंगळुरू मार्गावर पुल आहे. यापुलानजीक मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास 20 ते 25 जणांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली.  ट्रकच्या चाकातील हवा सोडून दिली. त्यानंतर जमावाने मागील आठ ते दहा वाहनांच्या काचा फोडून जमाव पसार झाला,  असे भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सिंहगड पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पसार झालेल्यांचा शोध घेऊन पंधरा जणांना अटक केली. त्यासोबतच तपासादरम्यान अविनाळ दत्तात्रय एडगे (औडी. ता. जत, जि. सांगली) व वसंत अप्पासाहेब सर्जे (मंगळवार पेठ ता. कराड, जि. सातारा) यांच्या खिशातील पाकिट व रोख रक्कम 2900 व 1200 रुपये मारहाण करून काढून घेतली असे समोर आल्याने त्यात दरोड्याची कलमवाढ करण्यात आली.

सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मंजूर केली.  दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 36 चित्रपटगृहात 80 स्क्रिनवर पद्मावत दाखवला जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  सार्वजनिक  ठिकाणी 50 पोलिस अधिकारी, 250 पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर चित्रपटगृहांनाही त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याबाबत आणि सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त संजय बाविस्कर यांनी दिली.