Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Pune › वादातून जाळून मारण्याचा प्रयत्न

वादातून जाळून मारण्याचा प्रयत्न

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:14AMपिंपरी : प्रतिनिधी 

काळेवाडी, तापकीरनगर येथे पूर्वी झालेल्या वादातून एका नातेवाईक तरुणाने महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये स्वतः तरुणही भाजला गेला; तसेच आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. वाकड पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी संदीप हरिश्‍चंद्र सावंत (37, रा. यश कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर नितीन एकनाथ सावंत (30, रा. बालाजीनगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीत संदीप यांची आई कांताबाई सावंत (58) आणि नितीन हे दोघे भाजले असून, कांताबाई यांची प्रकृती गंभीर आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे भागवत गोरे यांच्या खोल्यांमध्ये सावंत परिवार भाड्याने राहतो. काही दिवसांपूर्वी संदीप आणि त्यांचा चुलत-चुलत भाऊ नितीन यांच्यात वादावादी झाली होती. त्या वेळी संदीप याने त्याला मारहाण केली. याचा राग मनात धरून मंगळवारी रात्री संदीप यांची आई कांताबाई घरात असताना तो एका कॅनमध्ये रॉकेल घेऊन आला आणि कांताबाई यांच्याशी वाद घालून त्याने रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये कांताबाई गंभीररीत्या भाजल्या, तर नितीनही भाजला गेला. दोघांनाही उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.