Mon, Mar 25, 2019 18:06होमपेज › Pune › शहर भाजपातील वाद संपता संपेना

शहर भाजपातील वाद संपता संपेना

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:46PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

शहर भाजपमधील वाद मिटण्याची चिन्हे दिसेनासी झाली आहेत. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाबाबत शंका उपस्थित करून आ.लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेविका माया बारणे यांनी केलेला अपशकुन, आ. महेश लांडगे यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करत प्रकल्पास मंजुरीसाठी करावी लागलेली धावपळ यातून हे वाद चव्हाट्यावर आलेच; परंतु पालिका सभेत विधी समितीवर इच्छुक असताना क्रीडा, कला, साहित्य समितीवर नियुक्ती झाल्याने बाहेरून आलेल्यांना पदे दिली जात असल्याचा आरोप करत अश्विनी बोबडे यांनी दिलेला राजीनामा, भाजपचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मनोरुग्ण असा त्यांचा केलेला उल्लेख यामुळे भाजपच्या शिस्तीची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली गेली आहेत.

पालिका निवडणुकीत तिकीट वाटपात आयारामांना संधी दिल्याने भाजप निष्ठावंतांनी रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तिकीट वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप केला. गुंडापुंडांचा पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीतील अनेकांना संधी दिल्याने भाजपची राष्ट्रवादी झाली असल्याची टीका केली. काही भागात स्थानिक नेत्यांचे फोटो असलेले पोस्टर्स फाडण्यात आले. 

पालिका निवडणुकीनंतर महापौर निवडणुकीतही बरेच राजकारण झाले. स्थायीवर संधी न दिल्याने शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला. स्वीकृत सदस्य निवडणुकीत भाजपतर्फे माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे या जुन्या व काँग्रेसमधून आलेल्या बाबू नायर यांना संधी मिळाली. त्यानंतर पक्षविरोधी काम करणार्‍यांनाच बक्षिसी दिल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर खा. अमर साबळे, सचिन पटवर्धन यांच्या पुतळ्याचे दहन केले.

पालिकेत समाविष्ट गावासाठी 425 कोटींच्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप  झाला. खासदार अमर साबळे यांनीही चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे स्थायीच्या तत्कालीन अध्यक्षा सीमा सावळे संतापल्या ‘मी आमदारकीची दावेदार असल्याने व त्यांना आपल्या मुलीला उभे करावयाचे असल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे.’ या शब्दात त्यांनी साबळेंवर तोफ डागली. यानंतर एका कार्यक्रमात आ. महेश लांडगे यांनी सीमा सावळे यांना क्लीन चिट दिल्याने सावळे-लांडगे युतीची चर्चा रंगली.

स्थायी अध्यक्षपदासाठी आ. लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांना संधी दिल्याने महापौर नितीन काळजे, स्थायी अध्यक्षपदासाठी इच्छुक राहुल जाधव, शीतल शिंदे यांचे राजीनामा नाट्य रंगले. गायकवाड निवडून आल्या मात्र राहुल जाधव, शीतल शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे दोन जागांसाठी नियुक्त्या कराव्या लागल्या.

‘वेस्ट टू एनर्जी’वरून आ. जगताप समर्थक माया बारणे यांनी शंका उपस्थित केल्याने भाजपच्या नेत्याचे चिरंजीव व आ. महेश लांडगे यांना सभागृहात विषय मंजुरीसाठी फिल्डिंग लावावी लागली. महासभेत ‘विधी’वर इच्छुक असताना क्रीडा समितीवर नियुक्ती झाल्याने बाहेरून आलेल्यांना पदे दिली जात असल्याचा आरोप करत अश्विनी बोबडे यांनी दिलेला राजीनामा, भाजपचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मनोरुग्ण असा त्यांचा केलेला उल्लेख, यामुळे भाजपमधील वाद अक्षरशः चव्हाट्यावर आले आहेत.

 

Tags : pimpri, pimpri news, BJP, Dispute,