Wed, Mar 20, 2019 23:08होमपेज › Pune › विल्हेवाट कचर्‍याची की कामगारांची

विल्हेवाट कचर्‍याची की कामगारांची

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 12:28AMपुणे : शीतल कोरे

अलीकडच्या काळात कष्ट कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विविध क्षेत्रात उपलब्ध होत असताना आपल्या देशातील सफाई कामगारांचे काबाडकष्ट मात्र कमी झालेले नाहीत. त्यामुळे विल्हेवाट नेमकी कचर्‍याची लावली जाते आहे की, सफाई कामगारांची हा प्रश्‍न पडतो.

पुणे महानगरपालिकेचा परिसर 224 चौरस किलोमीटर आहे. तो येत्या काही वर्षात ‘लॅण्डफिल्स’मुक्त (संपूर्ण शहरातील कचरा टाकण्याची जागा) करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे तत्कालीन आयुक्त संजय गावडे यांनी 2014 मध्ये तशी घोषणा केली होती. 2031 पर्यंत रोजची कचरा निर्मीती 3600 टनापर्यंत जण्याची शक्यताही पालिकेने वर्तविली होती. 

पुण्यात प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी 400 ग्रॅम वजनाएवढा कचरा निर्माण करते. महापालिका अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार पुण्यात निर्माण होणार्‍या घन कचर्‍याचे रोजचे प्रमाण 1400 ते 1600 टन आहे. त्यामधील 25 टक्के कमर्शिअल, 15 टक्के हॉटेल रेस्ट्रॉरंट, 10 टक्के, मटन मार्केट, भाजी मंडईचा, तर घरातून निर्माण होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण 40 टक्के इतके आहे. आपण निर्माण केलेल्या कचर्‍यात भाज्यांचा चोथा, खरकटे, प्राण्यांच्या मांसाचे तुकडे, फळांच्या टणक साली, कागद, काच, प्लास्टिक, फायबर, असे बरेच घटक असतात. ई- कचर्‍याचीही त्यात भर पडत आहे. अलीकडेच शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी प्लास्टिक व फायबरही कचर्‍यात मोठ्या प्रमाणावर आढळते. 

वाढत्या कचर्‍याबरोबर त्याच्या सफाईसाठी मनुष्यबळही वाढविणे आवश्यक असले, तरी प्रत्यक्षात मात्र आहे त्याच माणसांकडून ही कामे करुन घेतली जातात. कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या तुलनेत निम्मे देखील वेतन मिळत नाही. महापालिकेत झाडूकाम करणार्‍या कर्मचार्‍याला दररोज दोन किलोमीटरचा परिसर स्वच्छ करावा लागतो. उत्सवाच्या काळात त्यांना अधिक कामाचा भार उचलावा लागतो. कंत्राटी कामगारांना त्याचा ओव्हटाईमही मिळत नाही. वर्गीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची साधने अनेकदा मागण्या केल्यावर मिळतात. हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने फार काळ टिकत नाही. अनवाणी काम केल्यामुळे त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो. 

नागरिक ओला व सुका कचरा एकत्रच ठेवत असल्याने ‘स्वच्छ’ संस्थेतील कचरा गोळा करणार्‍या स्त्रियांना हे काम करावे लागते. या स्त्रियांना हातगाडी पद्धतीचे कंटेनर दिले आहेत. यातील कचर्‍याचे वजन 90 किलोपर्यंत असू शकते. इतक्या वजनाचा कचरा गोळा करुन तो ढकलत मोठ्या कंटेनरपर्यंत आणावा लागतो. कचर्‍यात असणार्‍या काच, पत्रा, फायबर, ई- कचर्‍यातील उघड्या सुया, औषधांच्या फुटलेल्या बाटल्या, बँडेज यामुळे संसर्ग होऊ शकतो. तसेच घरात 3 टक्के निघणारा कचरा हा लहान मुले, आजारी, वृद्धांचे डायपर्स यांचा असतो.

ते हाताळणेही आरोग्याला अपायकारक ठरू शकते. या सर्व कामाच्या मोबदल्यात दारोदारी कचरा वेचणार्‍या स्त्रियांना प्रत्येक घरातून महिना 30 रुपये मिळावे अशी अपेक्षा असते. परंतु नागरिक पैसे देण्यास टाळाटाळ करतात. महापालिका दोन महिन्यातून एकदा काही तुटपुंजी रक्कम चेक स्वरुपात यांना देते. थोडक्यात या असंघटीत क्षेत्रातील घटकांसाठी शासकीय पातळीवर काही ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरजे चे आहे.