Sat, Feb 23, 2019 10:07होमपेज › Pune › संग्रहालयातून भूगर्भातील रहस्यांचा होणार उलगडा

संग्रहालयातून भूगर्भातील रहस्यांचा होणार उलगडा

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:49AMपुणे : शंकर कवडे

जमिनीखाली सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असलेल्या पाण्यास अऩन्यसाधारण महत्त्व आहे. सद्य:स्थितीत भूगर्भात असलेल्या पाणीसाठ्यातून वापरण्यायोग्य पाणी अनेकांची तहान भागवत आहे. पावसामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण झाल्यानंतर पाण्याचा होणारा पुढचा प्रवास आता अंतर्गत व बाह्य संग्रहालयातून नागरिकांना अनुभवता येणार आहे. शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल भवनात अत्याधुनिक अंतर्गत व बाह्य संग्रहालय उभारण्यात येत असून यामुळे भूगर्भातील रहस्यांचा उलगडा  होणार आहे. 

भूजल विभागाच्या विविध उपक्रमांसह ऐतिहासिक यंत्रे, भूजलपातळीशी संबंधित माहिती प्रत्येकाला व्हावी या उद्देशाने हे संग्रहालय साकारण्यात येत आहे. खुल्या संग्रहालयामध्ये 12 प्रकारचे विविध साहित्य ठेवण्यात येत आहे. 1972 च्या दुष्काळामध्ये युनिसेफकडून भारताला भेट मिळालेल्या आठ विंधन यंत्रापैकी राज्याला मिळालेले एक विंधन यंत्रामुळे सुरवातीच्या काळ अनुभवता येणार आहे. सद्य:स्थिती बाह्य संग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असून याठिकाणी हातपंपाचे विविध प्रकार, पाणी मोजण्याचे मीटर, रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरउर्जेचा पॅनेल, पाण्याची टाकी आदीं ठेवण्यात येणार आहे. संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंची माहिती तसेच कार्य नागरिकांना मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध होणार आहे.

रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरउर्जेवर आधारीत दुहेरी नळ पाणी पुरवठा आदी भुजल विभाग राबविण्यात असलेल्या योजनांचे प्रात्यक्षिक नागरीकांना दाखविण्यात येणार आहे. भूजल भवनाच्या अंतर्गत असलेले संग्रहालयही डिजीटल स्वरुपात नव्याने लोकांसमोर येणार आहे. संग्रहालयात विविध योजनांच्या प्रतिकृतीही तयार करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरीद्वारे, भूपृष्ठावरील पाण्याद्वारे, विहिंरीद्वारे, पाझर तलावात खोदलेल्या विहिंरीद्वारे कृत्रिम भूजल पुनर्भरणाची माहिती घेता येणार आहे. याखेरीज, विंधनविहिर घेतेवेळी वापरण्यात येणारी उपकरणे, पाणी काढण्यासाठी आवश्यक साहित्य, विंधन विहिर घेतेवेळी आढळून येणारे दगड आदी पाहता येणार आहे. याखेरीज, जलभंजन, बंधारे, शिवकालीन पाणी साठवण योजना, सौरउर्जेवरील आधारित दुहेरी पंप नळ पाणीपुरवठा योजना, जॅकेट वेल, वेल रिचार्ज आदींच्या प्रतिकृतींसह आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

 

Tags : pune, pune news, Geological secrets, museum,