Thu, Apr 25, 2019 05:32होमपेज › Pune › ढगाळ वातावरणामुळे वाढले आजार

ढगाळ वातावरणामुळे वाढले आजार

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:03PMपिंपरी : प्रतिनिधी 

शहरासह परिसरात काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळलेले वातावरण, थंड वारे, गारवा,  दमट हवामान, कोंदट हवा या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीच्या आजारांत वाढ झाली आहे. वातावरणातील बदलामुळे शहरातील महापालिका आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. 

पर्यावरणातील या बदलामुळे प्रकृतीत असंतुलन निर्माण झाल्याने ताप, डोके दुखी, अंग दुखणे, सर्दी, खोकला, वात विकार, हाडे दुखणे आदी आजार वाढले असल्यामुळे दवाखाने, रुग्णालयात नेहमीपेक्षाही फुल्ल गर्दी दिसत आहे. अधूनमधून  पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे उघड्या गटारातून वाहणारे पाणी, माश्या, मच्छर, दुर्गंधीमुळे जंतुसंसर्गाने होणार्‍या आजारात वाढ झाली आहे. यामध्ये हवेच्या माध्यमातून होणार्‍या संसर्गाने ताप येण्याचे प्रमाण वाढले असून अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे अशा तक्रारींतही वाढ झाली आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे लहान बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे वाताच्या रुग्णही अंगदुखी या सारख्या व्याधीने ग्रस्त झाले आहेत. 

अद्यापही रस्त्यावर सरबते, ज्यूस, आईसक्रिम, फळांचे काप आदी दुकाने थाटलेली आहेत. कधी कमी कधी जास्त होणार्‍या तापमानामध्ये नागरिक तहान भागविण्यासाठी सरबत, सोडा, शहाळे, बर्फावर ठेवलेले फळांचे काप आदींचे सेवन करतात. मध्येच अति थंड आणि अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा पेय पिल्याने शरीरिक संतुलन बिघडून आजाराला निमंत्रण मिळत आहे. 

बदलत्या वातावरणात शीतपेय आणि पदार्थांचा आधार घेतल्यामुळे खोकला, सर्दी, ताप असे विकार वाढत आहे. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. 

काय काळजी घ्यावी... 

या दिवसांत माश्यांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळी बाहेरचे अन्न किंवा शीतपेय आणि पदार्थ खाणे टाळावे. बदलत्या वातावरणात कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित वैद्यकीय उपचारघ्यावेत. भरपूर पाणी प्यावे. घरगुती अन्न खावे. आपली स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवा जेणेकरून साथीच्या आजारांना तोंड देता येईल.