होमपेज › Pune › निवेदकांच्या बातमीच्या ‘सोशल मीडिया’वर चर्चा

निवेदकांच्या बातमीच्या ‘सोशल मीडिया’वर चर्चा

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 11 2018 11:05PMवडगाव मावळ :  वार्ताहर

लगीनघाईमध्ये राजकीय पुढार्‍यांचे सोपस्कार पूर्ण करताना खापर मात्र निवेदकांवर फोडले जात असल्याबाबत ‘पुढारी’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताचे मावळ तालुक्यातील निवेदकांनी  उत्स्फूर्त स्वागत केले असून, सोशल मीडियावरही यासंदर्भात चांगलीच चर्चा रंगली होती.‘पुढारी’ने शुक्रवार दि.11 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तामध्ये विविध लग्नसोहळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या निवेदकांची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन-दोन तास तोंडाला फेस येईपर्यंत उपस्थितांचे शाद्बिक स्वागत करणार्‍या निवेदकाला एखाद्याचे नाव राहिले तर शिव्या खाण्याची वेळ येते.

आजकाल गावोगावी अन् घराघरात राजकारण सुरू असून याचाही परिणाम लग्नसोहळ्यांमध्ये पाहावयास मिळतो. लग्नसमारंभामध्ये उभय परिवाराकडून केले जाणारे जावई पाहुण्यांचे सन्मान, नवरदेवाचा सन्मान, उपस्थितांचे स्वागत व वधू-वरांना शुभाशिर्वाद हे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी पुढार्‍यांची नावे घेतली जातात.हे सर्व नियोजन निवेदक कुठलेही राजकारण न करता यशस्वीपणे पार पडतात, परंतु, आजूबाजूची काही मंडळी किंवा राजकीय व्यक्ती या नियोजनात हस्तक्षेप करतात आणि याचे खापर निवेदकावर फोडले जाते. असे अनेक प्रकार लग्नसोहळ्यामध्ये दिवसभर घडत असतात आणि कुठलाही मोबदला न घेता तोंडाला फेस येईपर्यंत बोलत राहणार्‍या बिचार्‍या निवेदकांचीच पंचाईत होते.एवढं करून स्वागत, शुभाशिर्वाद देणारे राजकीय व्यक्ती संबंधित निवेदकाचे साधे नावही घेत नाही किंवा उभय परिवाराकडून त्याचा साधा सन्मानही होत नाही हि मोठी शोकांतिका आहे. ही सद्य:स्थिती मांडल्यानंतर तालुक्यातील निवेदकांनी पुढारीच्या वृत्ताची दखल घेत सोशल मीडियावर चर्चेत भाग घेतला.