Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Pune › खासदारकीला लांडगे, तर विधानसभेसाठी कोण?

खासदारकीला लांडगे, तर विधानसभेसाठी कोण?

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 11 2018 11:04PMपिंपरी : संजय शिंदे

‘पार्टी विथ डिफरेन्स’ अशी भारतीय जनता पार्टी बद्दल नेहमी म्हंटले जाते. दबावाला न जुमानता प्रदेशाला जी योग्य भूमिका वाटते तिच सत्यात उतरते हे स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडीवरून सिद्ध झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे जवळपास भाजप मध्ये अंतिम झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे आ. महेश लांडगे यांना शिरूरसाठी प्रमोट करण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे; त्यामुळे विधानसभेसाठी पक्ष कोणाला संधी देणार याकडे भोसरीकरांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यात गाववाला की बाहेरवाला बाजी मारणार हे वेळच ठरविणार आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने 2019 मध्ये निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणूक 2019 साठी मिशन 350 जागांच ध्येय ठेवण्यात आले आहे . त्यानुसार प्रत्येक खासदार महत्वाचा असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभेची जागा महत्वाची असल्यामुळे पुणे जिल्ह्यात चार खासदार पैकी सध्या दोन शिवसेना, प्रत्येकी एक भाजप आणि राष्ट्रवादी असे सध्या बलाबल आहे. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये एका जागेची  चार जागा करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरीतील भाजपचे सहयोगी आ. महेश लांडगे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची पक्षात चर्चा आहे. 

लांडगे हे लोकसभेसाठी उभे राहीले, तर भोसरी विधानसभा मतदारसंघातील जागेवर कोणाला संधी देणार यावर पक्षात खल सुरू झाला आहे. भोसरी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आमदार बंधू संचिन लांडगे किंवा चाणक्य म्हणून ज्यांनी कीर्ती प्राप्त केली आहे असे आ.लांडगे यांचे धाकटे बंधू कार्तिक लांडगे या दोघांपैकी एकाला  आ. लांडगे ऐनवेळी पुढे करू शकतात अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्याच बरोबर भोसरीतील  लांडगे, फुगे, गव्हाणे, शिंदे भावकीबरोबरच मतदारसंघात असणार्‍या ओबीसी प्रवर्गातील एखाद्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी मिळू शकते. जे भोसरी आणि मतदारसंघातील समाविष्ट गावातील पै-पाहुण्यांच्या जोरावर बाजी मारू शकतात. तर समाविष्ट गावामध्ये ही लांडगे समर्थक विधानसभेला गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. 

आ. लांडगे यांच्या शब्दाला भाजप प्रदेश स्तरावर मान दिला जाणार, की ऐन वेळेला पुन्हा निष्ठावानच्या पदरात विधानसभेसाठी माप टाकले जाणार याकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात लक्ष लागून राहिले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीसाठी ते या जागेसाठी आपला हक्क सांगू शकतात; तसेच स्व.अंकुश लांडगे यांना मानणारा ही मोठा गट आज ही भोसरी मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांचे पुतणे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नावाचा ही विचार भाजपकडून केला जाऊ शकतो, अशी चर्चा शहर भाजपमध्ये आहे.

त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभेसाठी निवडणूक झाल्यास भाजप भोसरीतील गाववाले की मतदारसंघात स्थायिक झालेल्या बाहेरच्या कार्यकर्त्याला संधी देणार, तो सर्वसमावेशक उमेदवार असणार की पुन्हा दबावतंत्राचा वापर करून आ.लांडगे आपल्या हातात भोसरी विधानसभा मतदारसंघाची कमांड ठेवण्यासाठी प्रयत्न करणार हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या निर्णयावर ठरणार असल्यामुळे सध्यातरी भोसरी विधानसभा मतदारसंघात उमेदवार गाववाला की बाहेरवाला याबाबत खल सुरू झाला आहे.