Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Pune › शंकर शेठ रस्ता आरक्षण केंद्रात असुविधा

शंकर शेठ रस्ता आरक्षण केंद्रात असुविधा

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 17 2018 12:25AM

बुकमार्क करा
पुणे : निमिष गोखले

शंकर शेठ रोड येथील रेल्वे आरक्षण केंद्र सध्या असुविधांच्या गर्तेत सापडले आहे. डेक्कन रेल्वे आरक्षण केंद्रानंतर शहरातील सर्वात वर्दळ असणारे आरक्षण केंद्र म्हणून शंकर शेठ रोड येथील आरक्षण केंद्र ओळखले जाते. हडपसर, सातारा रस्ता, बिबवेवाडी, सहकारनगर, मुकुंदनगर, कात्रज, स्वारगेट या भागांतील नागरिकांना हे आरक्षण केंद्र जवळ आहे. पुणे स्टेशन येथे आरक्षण करायला जाणे ज्येष्ठ नागरिकांना जिकिरीचे पडते, म्हणून ते शंकर शेठ रोड येथील आरक्षण केंद्रात तिकीट काढण्यास पसंती देतात. मात्र, येथील आरक्षण केंद्राची पुरती दुरवस्था झाली असून तिकीट काढण्यास येणार्‍या नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत, असे धक्कादायक चित्र दिसून येते. 

शंकर शेठ रोड येथील आरक्षण केंद्रात दररोज सुमारे दीड हजार नागरिक तिकीट काढतात. तर सुट्ट्यांच्या हंगामात हाच आकडा दुपटीहून अधिक होत तीन हजारांच्या घरात जातो. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने येणार्‍या नागरिकांसाठी आरक्षण केंद्रात केवळ दहाच आसने बसविण्यात आली आहेत. त्यातील दोन आसने सध्या मोडली असून यामुळे नागरिकांना बसायला जागाच नाही, अशी आताची परिस्थिती आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांची खास करून गैरसोय होत असून त्यांना रांगेत तास न् तास ताटकळत उभे राहावे लागते. आरक्षण केंद्रात एकूण दहा खिडक्या आहेत, मात्र त्यातील केवळ दोनच खिडक्या सुरू असून तिसर्‍या खिडकीत केवळ आरक्षण फॉर्म मिळतो. यामुळे येथे रेल्वेचे तिकीट काढणार्‍यांची दररोज रांग लागलेली नजरेस पडते. आरक्षण केंद्रात पिण्याच्या पाण्याची कोणतीच सोय उपलब्ध नसल्याचेही दिसून येते. 

येथे टोकन सिस्टीमचा पत्ताच नसून फॉर्म भरून आरक्षण करणार्‍यास रांगेत उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे आरक्षण फॉर्म भरण्याकरिता कोणतीही सोय करण्यात आली नसून बहुतांश नागरिक तेथे ठेवलेल्या कूलर, जनरेटरवरच फॉर्म ठेवून तो भरत असल्याचे दृश्य दिसते. रेल्वेचे तिकीट उपलब्ध आहे का, हे पाहण्यासाठी केवळ एकच संगणक उपलब्ध असल्याने तिकीट काढणार्‍यांची फार मोठी गैरसोय होते. पुण्यातून जाणार्‍या रेल्वेंचे वेळापत्रक दोन बोर्डांवर येथे लावण्यात आले आहे. मात्र मजकुराचा आकार लहान असल्याने नागरिकांची पंचाईत होत असल्याचे दिसते. एकंदरीतच शंकर शेठ रोड येथील रेल्वे आरक्षण केंद्राची अवस्था असून अडचण, नसून खोळंबा अशी झाली आहे. 

बायोमेट्रिक टोकन मशिन उपलब्ध नाही
प्रमुख रेल्वे स्थानकांत व प्रमुख आरक्षण केंद्रांमध्ये बायोमेट्रिक टोकन मशिनची सोय करण्यात आली आहे. मात्र शंकर शेठ रोड येथील आरक्षण केंद्रात ते उपलब्ध नसून यामुळे नागरिकांना मॅन्युअली फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. बर्‍याचदा रांगेत उभे असताना नंबरवरून वादविवादाचे प्रसंग देखील उद्भवले आहेत. पुणे विभागात सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद मशिन खरेदीसाठी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जिथे-जिथे बायोमेट्रिक टोकन मशिन बसविण्यात आली आहेत, तिथे ती नादुरुस्त आहेत, तर अन्य ठिकाणी त्याचा पत्ताच नसल्याचे दिसून येते.