होमपेज › Pune › शिस्तबद्ध भाजपच्या प्रतिमेस तडा

शिस्तबद्ध भाजपच्या प्रतिमेस तडा

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:22AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप प्रदेश समितीने निश्‍चित केलेल्या नावास आव्हान देत भाजपचे संलग्न आमदार महेश लांडगे गटाने राजीनामास्त्र उगारले आहे. परिणामी, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभाराचे बिरूद मिरविणार्‍या भाजपच्या प्रतिमेस  पहिले वर्षे संपता संपता तडे गेल्याचे धक्कादायक चित्र शहरवासीयांसमोर आले आहे. 

वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका आल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षपदाला फारच ‘महत्त्व’ प्राप्त आले आहे. त्यामुळे या पदावर आमदार लक्ष्मण जगताप, आमदार लांडगे गटासह निष्ठावंत भाजप गटानेही दावा केला होता. मात्र, प्रदेश समितीने पहिल्या वर्षी ठरलेल्या सूत्रानुसार आमदार जगताप गटास स्थायी  अध्यक्षपदाची उमेदवारी बहाल केली आहे. परिणामी, आमदार लांडगे यांच्या गटात संतापमिश्रित लाट उसळली आहे.

त्याची फलश्रृती म्हणजे आमदार लांडगे गटाचे महापौर, अध्यक्षपदाचे तीव्र इच्छुक राहुल जाधव, क्रीडा समिती व शहर सुधारणा समिती सभापतींनी राजीनामे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे आमदार लांडगे गटाने प्रदेश समिती निर्णयासमोरच आव्हान निर्माण केले आहे. तसेच, शहराध्यक्ष जगताप यांचा निर्णय ‘अंतिम’ नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर निष्ठावंत गटाचे शीतल शिंदे यांनीही सदस्याचा राजीनामा देऊन नापसंती जाहीरपणे प्रकट केली आहे.

सर्वांचे राजीनामे शहराध्यक्ष जगताप यांच्याकडे आहेत. नाराजांची समजूत काढली जाईल, असा दावा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केला आहे. मात्र, सध्या ऐकण्याचा मनस्थितीमध्ये कोणी पदाधिकारी दिसत नाही. हे राजीनामानाट्य किती दिवस टिकते, हेही पाहणे रंजक ठरणार आहे.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मोरेश्‍वर भोंडवे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांमधील नाराजी मतांच्या रूपात राष्ट्रवादीकडे वळल्यास निर्माण होणार्‍या राजकीय पटावर भाजपला खूप महाग ठरू शकते.

भाजपतील मूळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भोंडवेंच्या पाठीशी उभे राहत बंड पुकारल्यास शहरात वेगळे चित्र निर्माण होऊ शकते. भोंडवे यांना शिवसेनेसह मनसेनेचे जाहीरपणे समर्थन दिले आहे. शिवसेनेचे केवळ एकच मत आहे. मनसेची मतामध्ये शून्य किंमत आहे.  मात्र, सत्ताधार्‍यांच्या विरोधात विरोधकांची एकशक्ती दिसून येत आहे. पाणीपट्टी दरवाढीवरून विरोधकांची एकजूट स्पष्ट झाली आहे. नवी आघाडी किंवा युती सत्ताधार्‍यांना भविष्यात मोठी डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे.