Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Pune › आपत्ती नियंत्रणाला मिळाला अधिकारी

आपत्ती नियंत्रणाला मिळाला अधिकारी

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अखेर तात्पुरता का होईना पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. या कक्षाचे प्रमुख अधिकारी गणेश सोनुने हे परदेश दौर्‍यावर गेल्याने त्यांचा पदभार अन्य अधिकार्‍यांकडे सोपविण्याचा विसर प्रशासनाला पडला होता.

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पुण्यातही पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या पूरनियंत्रण कक्षाचे प्रमुख व आपत्ती निवारण अधिकारी हे सिंगापूरला तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत. मात्र, त्यांचा पदभार अन्य अधिकार्‍यांवर सोपविण्याचा विसर प्रशासनाला पडला होता. त्यामुळे ऐन पावसात पूरनियंत्रण कक्ष अधिकार्‍याविना होता. याकडे दै. ‘पुढारी’ने लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि अखेर बुधवारी या कक्षाची तात्पुरती जबाबदारी अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्याकडे देण्यात आली. 

पूरनियंत्रण कक्ष म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून समोर आले होते. त्यातच या कक्षाला अधिकारी देण्यासही पालिकेला विसर पडत असल्याने हा कक्ष शोभेचे बाहुले असल्याचेच स्पष्ट होत आहे.