Mon, Mar 25, 2019 05:11
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘वायसीएम’मध्येही आता दिव्यांगांना  मिळणार प्रमाणपत्र

‘वायसीएम’मध्येही आता दिव्यांगांना  मिळणार प्रमाणपत्र

Published On: Mar 20 2018 2:06AM | Last Updated: Mar 20 2018 1:01AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) द्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. दर गुरुवारी या प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. या दिवशी सुमारे आठ प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांसाठीच येथे सोय करण्यात आली आहे.

अपंगांना शासकीय सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी; तसेच नोकरीमध्ये अग्रक्रम मिळविण्याकरिता अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची गरज असते. ही प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून जिल्हा रुग्णालयात सोय केली आहे. अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी एकाच दिवशी उपलब्ध ठेवून अपंगांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत, जेणेकरून त्यांची होणारी फरफट थांबेल, असा या मागील हेतू होता. यामुळे अपंगांच्या शारीरिक व्यंगाचे प्रमाण निश्‍चित करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर होती. हे अधिकारी संबंधितांना प्रमाणपत्र बहाल करत. 

या प्रक्र्रियेत अत्याधुनिकता आणण्यासाठी शासनाने संगणकावर निर्माण केलेल्या विशिष्ट सॉफ्टवेअरच्या आधारे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. यानुसार बुधवारी जिल्ह्यातील अपंगांना हे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पिंपरी-चिंचवड परिसरासह उपनगरांतून अपंगत्वाचा दाखला घेण्यासाठी नागरिक येत आहेत. आता जिल्हा रुग्णालयाच्या सूचनेनुसारच महापालिका रुग्णालयाबरोबरच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्येही हे प्रमाणपत्रे देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयात ही सुविधा करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील हेलपाटे थांबणार

अपंग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप करण्याचा अधिकार केवळ जिल्हा रुग्णालयांना देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या सूचनेनुसार महापालिका रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांनाही याचे वाटप करता येणार आहे. या अगोदर प्रमाणपत्र हवे असल्यास नागरिकांना नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात जावे लागत असे. ‘वायसीएम’ रुग्णालयात हे उपलब्ध झाल्यामुळे हे हेलपाटे थांबणार आहेत.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा रुग्णालयात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लोकांनाच हे देण्याची सुविधा आहे. आठवड्यातील दर गुरुवारी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जात आहे. या दिवशी अद्याप तरी आठ प्रमाणपत्रांचे वाटप होत आहे. - डॉ. मनोज देशमुख, ‘वायसीएम’ वैद्यकीय अधीक्षक

 

Tags : Pimpri, Pimpri news, Disabilities, Disability Certificate, Yashwantrao Chavan Memorial Hospital,