Mon, Jun 24, 2019 17:56होमपेज › Pune › सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संकेतस्थळ बंदच

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संकेतस्थळ बंदच

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 12:52AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय सुमारे अठरा महिन्यांपासून संकेतस्थळाविनाच आहे. त्यामुळे, विभागातर्फे घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती कलावंतांपर्यंत, कलाप्रेमींपर्यंत आणि सांस्कृतिक संस्थांपर्यंत पोहोचत नाही. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे कलावंत संभ्रमावस्थेत असून, कलेची हानी होते आहे. शिवाय, केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेचा प्रशासनाला विसर पडलेला दिसतो आहे.

राज्यातील कला जोपासल्या जाव्या, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये, विविध नाट्य स्पर्धा, संस्थांना अनुदान, कलावंतांना मानधन, विविध पुरस्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार, हे सर्व उपक्रम कलावंत आणि कलाप्रेमींपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. त्याकरिता, ारहरीरपीर्ज्ञीीींळ.र्सेीं.ळप हे अधिकृत संकेतस्थळ विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, संकेतस्थळंच बंद असल्याने विविध उपक्रम लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत.

त्याउलट, विविध स्पर्धांचे निकाल, नव्या योजनांची माहिती, राज्य शासनाच्या संकेतस्थळावर किंवा विभागाच्या फेसबुक अकाउंटवर जाहीर केली जाते. यामुळे, राज्यातील प्रत्येक कलावंतापर्यंत, विशेषतः ग्रामीण भागातील कलावंत, उदयोन्मुख कलावंत, आणि संस्थांपर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कला उपयोगी उपक्रम पोहोचत नाहीत. या काळात सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या दोन संचालकांच्या बदल्या आणि मंत्रिमंडळसुद्धा बदलले. मात्र, संकेतस्थळ अद्यापही पूर्ववत झालेले नाही. 

एक महिन्यात संकेतस्थळ पूर्ववत होणार
याबाबत दोन दिवसांपूर्वी संबंधित संस्थेसोबत बैठक पार पडली. जुन्या संकेतस्थळामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे संकेतस्थळ पूर्ववत करण्यात येईल. त्यानंतर, यामध्ये काही अतिरिक्त बाबी समाविष्ट करण्यात येतील.  - संजीव पलांडे, प्रभारी संचालक, सांस्कृतिक कार्य