Tue, Jun 02, 2020 20:05होमपेज › Pune › ‘महाबँकेचे’ संचालक धारेवर

‘महाबँकेचे’ संचालक धारेवर

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 2:01AMपुणे : प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ रवींद्र मराठे यांना अटक झाल्याचे तीव्र पडसाद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी उमटले. बँकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत अनेक भागधारक संचालकांवर अक्षरशः तुटून पडले. विशेष म्हणजे बँकेच्या या सभेला आठपैकी दोनच संचालक उपस्थित होते. भागधारकांच्या संतापाला तोंड देताना त्यांच्या नाकीनऊ आले. 

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या अप्पासाहेब जोग सभागृहात गुरुवारी झाली. या सभेला सर्व संचालक उपस्थित असणे आवश्यक होते. आदल्याच दिवशी बँकेच्या दोन संचालकांना अटक झाल्यामुळे, सहा संचालक तरी उपस्थित राहतील, अशी बँकेच्या भागधारकांची अपेक्षा होती. तथापि कार्यकारी संचालक ए. सी. राऊत व दीनदयाळ आगरवाल असे दोघेच सभेस आल्याने भागधारकांनी चौकशी केली व राऊत यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने भागधारक संतापले. त्यांनी बँकेच्या कारभारावर तोंडसुख घेतले. 

‘बँकेच्या सर्वसाधारण सभेचे नियोजन दीड महिन्यांपूर्वी झालेले होते. तरीदेखील निम्मे संचालक या सभेला दांडी मारतात, याचा अर्थ त्यांना इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटत असाव्यात. त्यांच्या या निष्काळजीपणाबद्दल त्यांचे राजीनामे घ्यावेत’, अशी मागणी काही भागधारकांनी केली व मोठ्याने घोषणा दिल्या. यामुळे सभेतील वातावरण चांगलेच तापले. कर्मचारी भागधारक असणार्‍यांनी बँकेची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. सध्या सर्वच बँका अडचणीत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र बँकही अडचणीत असेल, तर त्यात विशेष काय, असे त्यांनी म्हणताच संतापलेल्या भागधारकांनी त्यांना गप्प केले. संचालक राऊत यांनीही बँकेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तथापि तो केविलवाणा ठरला. बँकेचे एक भागधारक विवेक वेलणकर यांनी बँकेच्या कारभाराविषयी काही आक्षेपार्ह मुद्दे उपस्थित केले. 

दोन वर्षे लाभांश नाही, कारभारात पारदर्शकता नाही, असे त्यांनी सुनावले. खासदार अनिल शिरोळे यांनी दोन महिन्यांपूर्वी मागवलेली माहिती त्यांना अद्याप देण्यात आली नाही, मग सामान्य खातेदारांची काय किंमत? असा प्रश्‍न वेलणकर यांनी जोरकसपणे मांडला. यावरून वाद-प्रतिवाद सुरू झाल्याने सभेत चांगलाच गोंधळ माजला.‘बँक शेअर होल्डर असोसिएशन’चे प्रेसिडेंट सुहास वैद्य यांनी महाराष्ट्र बँकेच्या कारभाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. अटक झालेल्या संचालकांनी व अधिकार्‍यांनी काहीच वावगे केले नसेल, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करणारे मूर्ख आहेत का? त्यांच्याकडे काही पुरावे असतील, म्हणूनच त्यांनी कारवाई केलेली असणार, हे सत्य का नाकारले जात आहे, असे वैद्य यांनी राऊत यांना विचारले. 

बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांच्याबद्दच आपण तक्रार केली होती. त्यावरच कारवाई होऊन मुहनोत यांना काढून टाकण्यात आले होते. अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍याचे छायाचित्र बँकेच्या माजी अध्यक्षांच्या मांदियाळीमध्ये अप्पासाहेब जोग सभागृहात का लावण्यात आले, असा प्रश्‍न वैद्य यांनी उपस्थित केला.  गेल्या आठवड्याभरात बँकेच्या शेअरचा भाव 18 रुपयांवरून 13 रुपयांवर आला, त्याबद्दलही भागधारकांनी खदखद व्यक्त केली.