Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Pune › संचालक, मुख्याध्यापकांना मारहाण; उपायुक्तांनी घेतली दखल

संचालक, मुख्याध्यापकांना मारहाण; उपायुक्तांनी घेतली दखल

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:52AMविश्रांतवाडी : वार्ताहर

अनाधिकृत बांधकामाच्या कारवाईवरून शाळेतील संचालक, मुख्याध्यापकांना महापालिका अतिक्रमण विभागातील महिला पोलीस निरीक्षकांकडून मारहाणीचा गंभीर प्रकार धानोरीत घडला होता. याप्रकरणाची पोलीस उपायुक्तांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांची नेमणुक केल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त दिपक साकोरे यांनी  दिली.

धानोरीतील मुंजाबा वस्तीतील प्रगती इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या आवारात बांधलेले अनाधिकृत बांधकाम मंगळवारी पालिकेकडून पाडण्यात आले.  कारवाईपूर्वीच शाळेतील मुलांना बाहेर जाऊ देण्याची मागणी करणार्‍या शाळेच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका व संचालकांना बंदोबस्तासाठी आलेल्या महापालिका अतिक्रमण विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक दिपाली धाडगे यांनी मारहाण केली होती. शाळेच्या आवारातच विद्यार्थी, पालकांसमोर हा प्रकार घडल्याने विद्यार्थी भयभयीत झाले होते. रौद्ररूप धारण करत पोलीस निरीक्षक दिपाली धाडगे यानी कारवाईच्या दरम्यान गोंधळ घातला. हा संपूर्ण प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही फूटेज मध्ये कव्हर झाला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक दिपाली धाडगे यांनी संचालक व मुख्याध्यापिकांना मारहाण केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. त्याचबरोबर बंदोबस्ताला असलेल्या ताफ्यात पोलीस कर्मचार्‍यांस देखील पोलीस निरीक्षक दिपाली धाडगे यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फूटेज मध्ये दिसत आहे.

उपायुक्त दिपक साकोरे म्हणाले, सदर शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिकेकडून स्थानिक पोलीसांना दिली नव्हती.  संचालक, मुख्याध्यापिका व शिक्षकांना झालेल्या मारहाणीची  लेखी तक्रार विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे. सीसीटीव्ही फूटेज देखील तपासले गेले आहेत.  सीसीटीव्ही फूटेज पाहून संबंधित पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्तांतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी अनाधिकृत बांधकामे असताना शाळेतील बांधकामांवर कारवाई का करण्यात आली याची देखील चौकशी केली जाणार असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे साकोरे यांनी सांगितले.