Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Pune › दीड महिन्यात शहरात प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी : आयुक्त हर्डीकर 

दीड महिन्यात शहरात प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी : आयुक्त हर्डीकर 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:42AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘पार्किंग पॉलिसी’ची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या दीड महिन्यात प्रत्यक्ष ती कार्यान्वित होईल. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक रहदारीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. पॉलिसी लागू झाल्यानंतर ठराविक रस्त्यावर वाहने लावण्यासाठी तासानुसार शुल्क द्यावे लागणार आहे. 

शहराची लोकसंख्या 25 लाखांचा पुढे असून, वाहनसंख्या 16 लाख आहे. शहरात वाहन पार्किंग हा एक जटिल प्रश्‍न बनला आहे. शहराची वाढती लोकसंख्या व वाहनांची मोठी संख्या लक्षात घेऊन वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी पालिकेने देश व परदेशातील ‘मेट्रो सिटी’चा अभ्यास करून ‘पार्किंग पॉलिसी’ तयार केली. त्यास सर्वसाधारण सभेने 22 जूनला मंजुरी दिली. 

या संदर्भात आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, ही पॉलिसी राबविण्यासाठी खासगी सल्लागारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने सर्व वाहनांसाठी शुल्क वसुलीसाठी ठेकेदार नियुक्त केले जात आहेत. त्यांच्यामार्फत ही वसुली केली जाईल. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष पार्किंग पॉलिसी सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पार्किंगचे क्षेत्र विकसित केले जातील. आवश्यक ठिकाणी रस्त्यावर रंगाचे पट्टे मारली जातील. शहरात पार्किंग पॉलिसी लागू झाल्यानंतर रस्त्यावर व घराबाहेर वाहने लावण्यास नागरिकांना शुल्क द्यावे लागणार आहे. वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून ही पॉलिसी असून, त्यातून उत्पन्नप्राप्तीचा हेतू नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे. 

शहरातील सर्व भागांतील निवासी पार्कींगसाठी शुल्क दिवसानुसार आकारले जाणार आहे. नागरिकांना सोईचे व्हावे म्हणून वार्षिक परवाना दिला जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 8 या वेळेसाठी मोटारी व टेम्पोसाठी 25 रुपये प्रतिदिननुसार 9 हजार 125 वार्षिक परवाना आहे. दुचाकीसाठी 5 रुपयांप्रमाणे 1 हजार 825 रुपये, रिक्षासाठी 15 रुपयांप्रमाणे 5 हजार 475 रुपये,  मिनी बससाठी 38 रुपयांप्रमाणे 13 हजार 688 रुपये, ट्रकसाठी 55 रुपयांप्रमाणे 20 हजार 75 आणि खासगी बससाठी 98 रुपयांप्रमाणे 35 हजार 588 रुपये वार्षिक शुल्क असणार आहे. या वार्षिक शुल्कात 25 टक्के सूट देण्यात आली आहे. 

दरम्यान, गावठाण भाग, झोपडपट्टी आदी भागांत ही पॉलिसी लागू नाही.  सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना शुल्क आकारण्यात येणार नाही. 

या रस्त्यावर द्यावे लागणार शुल्क 

शहरातील सर्व बीआरटीएस रस्ते, पिंपरी कॅम्प बाजारपेठ, भोसरी गाव, नाशिक फाटा उड्डाणपूल चौक तसेच, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी रेल्वे स्थानक परिसर, देहू-आळंदी रस्ता, प्राधिकरण परिसर, भूमकर चौक ते केएसबी चौक रस्ता या मार्गांवरच सशुल्क पार्किंग योजना राबविली जाणार आहे. प्रत्येक तासाला दुचाकीसाठी दीड रुपया, रिक्षासाठी 4.5 रुपये, मोटार व टेम्पोसाठी 7.5 रुपये, मिनी बससाठी 11.25 रुपये, ट्रकसाठी 24.75 रुपये व खासगी बससाठी 29.25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून इतर रस्त्यांवर टप्पा-टप्प्याने ही पॉलिसी लागू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.