Sat, May 25, 2019 23:08होमपेज › Pune › ब्लॉग : डांगी पॅटिस आणि डिजिटल युग!

ब्लॉग : डांगी पॅटिस आणि डिजिटल युग!

Published On: Mar 23 2018 3:49PM | Last Updated: Mar 23 2018 4:03PM - विश्वनाथ गरुड

पुढारी ऑनलाईन टीम : 

शीर्षक गोंधळात टाकणारं वाटतंय का... हे डांगी पॅटिस काय आणि त्याचा डिजिटल युगाशी काय संबंध, असा प्रश्न तुमच्या मनात येणं अगदी स्वाभाविक! पण खूप दिवसांपासून या दोन टोकाच्या बिंदूंमधला प्रवासाबद्दल माझ्या मनात विचार सुरू आहेत. काळ बदललाय... बदल हेच जीवन... तंत्रज्ञानाचं युग आहे... वगैरे वाक्य तुमच्याही समोर अनेकवेळा येऊन गेली असतील. पण म्हणून खरंच काय बदललंय. या बदलांना सगळेच शरण गेलेत का... ज्यांनी नव्याचा स्वीकार केला नाही... त्यांचा अस्त होईल का... असेही एक ना अनेक प्रश्न मनात येतात. पण मग डांगी पॅटिस दिसतं आणि प्रवाहाच्या विरूद्ध दिशेलाही बघितलं पाहिजे, याची जाणीव होते.

तुम्ही जर पुणेकर असाल, तर तुम्हाला डांगी पॅटिसबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. सगळ्यांनाच डांगी पॅटिस माहिती असेल, अशीही शक्यता नाही. पुण्यात दीप बंगला चौकाकडून गोखलेनगरच्या दिशेने जाताना रस्त्यात डाव्या बाजूला एक दुकान दिसतं. दिवसातला बहुतांश वेळ ते बंदच असतं. पण ज्यावेळी ते सुरू असतं, त्यावेळी तिथं ग्राहकांची भलीमोठी गर्दी पाहायला मिळते. आता असं दुकान तुम्हाला दिसलं की तिथं वर डांगी पॅटिस अशी पाटीही दिसेल. तर डांगी पॅटिस हे पुण्यातलं खवय्यांचं आवडीचं ठिकाणं. पाव पॅटिस एवढा एकच पदार्थ कमीत कमी वेळ पण जास्तीत जास्त चवीचा इथं मिळतो. तो खाण्यासाठी खवय्यांची तोबा गर्दी उसळते. मी आधी म्हटलं त्याप्रमाणं दिवसातला खूप कमी वेळ हे दुकान उघडं दिसतं. म्हणजे सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ४ ते ६ एवढे चारच तास हे दुकान उघडं असतं. गेले कित्येक दिवस... महिने... वर्षे... दर दिवशी हे दुकान त्याच वेळेला उघडतं. आणि वेळेपूर्वीच (पॅटिस संपल्यानं) बंद होतं. पण आजही दुकान उघडण्यापूर्वी अनेक ग्राहक दुकानाच्या शटरकडे डोळे लावून बसलेले असतात, त्याचबरोबर पॅटिस संपल्यामुळे निराश चेहऱ्याने परततानाही अनेकजण दिसतात. काळ बदलला... वर्षे बदलली... पण डांगी पॅटिस अजिबात बदलले नाही. त्याची चवही कायम आहे आणि दुकानाची वेळही...

डांगी पॅटिसचं दुकान बघितलं की मला हमखास कॉन्फरन्समध्ये, मीटिंग्जमध्ये, परिसंवादांमध्ये समोरच्यांना ज्ञानामृत पाजणाऱ्या व्यक्ती आठवतात. आता डिजिटल युग आलंय... तुम्ही कसं बदलंल पाहिजे... बदल केला नाही तर तुम्ही संपून जाल... तुम्हाला लोकांची गरज आहे... लोकांना तुमची अजिबात नाही... वगैरे वगैरे सांगत असतात ही मंडळी. परिस्थिती अगदी पूर्वीसारखी राहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. डिजिटल युगामुळे सेवा क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिलीत. तंत्रज्ञानामुळे शेकडो बदल झालेत आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांवर दिसूही लागलेत. पण म्हणून एकाच भिंगातून या सगळ्याकडं बघण्याची गरज निश्चितच नाही. बदलाची गरज नक्की काय आहे, हे समजूनच न घेता केवळ सामाजिक दबावापोटी त्याच्या आहारी जाण्याची गरज तर त्याहूनही नाही.

डांगी पॅटिस हे दुकान या सगळ्या परिस्थितीत प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला बघायला शिकवतं. केवळ पदार्थाची चव, त्याचा दर्जा आणि लोकांचा विश्वास याच जीवावर हे दुकान तीव्र स्पर्धेच्या युगात स्वतःच्या अटींवर व्यवसाय करतंय.  एकीकडे डिजिटल युगात नानाविध नवनवीन संकल्पना उदयाला आल्या. होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी, कॅशबॅक, कस्टमाईज्ड डिलिव्हरी ऑप्शन, रिप्लेसमेंट ऑप्शन, ऑनलाईन पेमेंट, वॅलेट पेमेंट, व्हाऊचर एन्कॅशमेंट वगैरे. ग्राहकांना वेळ नाही, असं गृहीत धरून त्यांना त्यांच्या सोयीनुसार, गरजेनुसार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्यांची चढाओढ सुरू आहे. केवळ जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जाताहेत. मार्केटिंग, रिमार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग... पुढ्यात उपलब्ध असलेल्या सर्वच पर्यायांचा वापर करण्यावर भर दिला जातोय. या सगळ्याचा साक्षीदार झालेलो असतानाच दुसरीकडं मला डांगी पॅटिसचे दुकान आठवतं. दुकान उघडं असेल तर काऊंटरवर ग्राहकांची झुंबड उडालेली असते आणि बंद असेल तर घड्याळात किती वाजलेत बघणारे ग्राहक दिसतात. आपल्या पदार्थाचा युएसपी काय, हे ओळखून आणि चव कायम ठेवून डिजिटल युगातील बदलांना कात्रजचा घाट दाखवत डांगी पॅटिसने स्वतःचे स्थान कायम ठेवलंय. शाळा-कॉलेजमध्ये शिकवतात ना... प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच… तसंच आहे हे अगदी.

डिजिटल युग... तंत्रज्ञान... बदलती जीवनशैली... हे सगळं आहेच. पण आपल्या उत्पादनाचा दर्जा काय... गुणवत्ता काय... हे सुद्धा तितकेच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे इतकंच...

  - विश्वनाथ गरुड

wishwanathhere@gmail.com

 

Tag : digital world, digital era, digital world challenges, product quality, dangi pattice, new concept, blog by wishwanath garud, new media, customer service, pune fool outlets