Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Pune › कामगार महिलांची घुसमट थांबणार कधी

कामगार महिलांची घुसमट थांबणार कधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दिघी : बापू जगदाळे 

  पिंपरी चिंचवड शहरात हजारो सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था कंपन्या आहेत. या ठिकाणी लाखो महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. सध्या देशभरातील महिलांच्या असुरक्षिततेचा विचार करता शहरातील कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. सर्वोच्च न्यालयाच्या लैंगिक अत्याचारविरोधी समित्या व विशाखा समिती प्रत्येक कामाच्या ठिकाणी स्थापन करण्याच्या निर्देशाला शहरात सर्वच ठिकाणी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगार महिलांची कामाच्या ठिकाणची घुसमट थांबणार कधी? असा सवाल महिला व विद्यार्थिनींना पडला आहे.  

 भवरीदेवी या राजस्थानमधील महिलेवर काम करत असताना झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने 1997 मध्ये सर्व आस्थापनांना काही सूचना दिल्या. ’विशाखा मार्गदर्शक तत्त्वे’ नावाने ओळखल्या जाणार्‍या या सूचना सर्व कार्यस्थळे, जिथे महिला काम करतात त्यांना लागू आहेत. परंतु, या आदेशाचे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ने अजूनही पालन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता रामभरोसे असून महापालिका प्रशासन व पोलिसांनी याची गंभीर दाखल घेणे गरजेचे  हे. 
    भोसरी चाकण मोशी, परिसरातील औद्योगिक कंपन्यांत दररोज हजारो महिला काम करतात.

तसेच आयटी कंपन्या, खाजगी सरकारी बँका, सहकारी संस्था, मॉल्स, दुकाने, शोरूम्स, खाजगी कार्यालये याठिकाणीही बहुतांश महिला काम करतात. अशा ठिकाणी महिलांना मानसिक व शारिरिक त्रासाच्या अनेक तक्रारी यापूर्वीही ठिकठिकाणच्या पोलीस स्थानकांत दाखल करण्यात आल्या आहेत. परंतु, अशा घटना घडू नये व विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर जरब बसावा यासाठी केलेल्या नियमांचे पालन करणे ही डोकेदुखी आहे अशी काही कार्यस्थळांवर मानसिकता दिसून येते. महिला कामगारांची मुस्कटदाबी कॉपोर्रेट क्षेत्र व खासगी कंपन्यांमध्ये स्त्रियांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सोसावा लागला तर त्याचे परिणाम म्हणजे एक तर ती नोकरी सोडते किंवा ती ते सहन करते. सरकारी, निमसरकारी क्षेत्रात स्त्रिया बदली करून घेतात किंवा रजेवर जातात. अशा विविध कारणांमुळे घराबाहेर काम करणार्‍या महिलांची कामाच्या ठिकाणी मुस्कटदाबी होत आहे.