पिंपरी : प्रतिनिधी
धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा अहिल्यादेवी चैतन्य मंडळाचे कार्याध्यक्ष व काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर यांनी दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात रुपनर यांनी म्हटले आहे की, चार वर्षांपुर्वी राज्यात सत्तांतर झाले. आघाडीचे सरकार जाऊन भाजप प्रणित युतीचे सरकार सत्तेवर आले. विधानसभा निवडणुकीपुर्वी धनगर समाजाने आरक्षणासाठी राज्यभर चळवळ उभारुन पंढरपूर ते बारामती पायी मोर्चा काढला होता. मोर्चानंतर बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे समाजाचे युवक प्रतिनिधी आमरण उपोषणाला बसले होते.
यावेळी विरोधी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस, आमदार बाळा नांदगावकर, विजय शिवतारे यांनी उपोषण करणा-या युवकांची भेट घेऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. फडणवीस यांनी जाहिर आश्वासन दिले होते की, ीनिवडणुकीनंतर राज्यामध्ये भाजपची सत्ता आली तर कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगर समजाला आरक्षण देण्याचा ठराव पास करु. या आश्वासनावर विश्वास ठेवून धनगर समाजाने राज्यामध्ये भाजपला मतदान केले. भाजपची सत्ता येऊन चार वर्षे उलटली तरी, मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाला धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचा सोयीस्कर विसर पडला आहे.
धनगर समाज मुळताच कष्टाळू व लढवय्या आहे. आता आरक्षणासाठी पुन्हा लढा उभारण्याची वेळ आली आहे. धनगर समाजाची बारामती, सोलापूर, माढा, बीड, सांगली, कोल्हापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, हातकणंगले या मतदार संघांसह राज्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदार संघांत लक्षणिय लोकसंख्या आहे. याची जाणीव राज्यसरकारने ठेवावी असा इशारा रुपनर यांनी दिला आहे.