Sat, Aug 24, 2019 21:53होमपेज › Pune › धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात!

धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात!

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 12:53AMपुणे : सुहास जगताप

गेल्या आठवड्यापासून राज्यभर राखीव जागांसाठी सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन आठवडा संपताना हिंसक झाले. जिल्ह्याच्या दक्षिण भागात मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलने सुरू असताना उत्तरेकडील भाग मात्र शांत होता. परंतु, सोमवारी (दि. 30) खेड तालुक्यातील चाकण आणि राजगुरुनगर येथे मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला मात्र हिंसक वळण लागले. मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतानाच धनगर समाजाने आता त्यांच्या आरक्षणाच्या जुन्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या समाजातही आरक्षणाच्या मागणीवरून आपल्याला फसविले गेल्याची धगधग आहे. त्यातच चौंडी येथे आंदोलकांवर भरलेल्या खटल्यांचा रागसुद्धा समाजाच्या मनात आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनांवरून गेल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये मोठी हालचाल दिसून आली. 16 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यात गावोगावी मराठा समाजाने आंदोलन पुकारले होते. त्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा आदींचा समावेश होता. बहुतांश ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. परंतु त्याचा कळस सोमवारी (दि.30) खेड तालुक्यातील चाकण आणि राजगुरुनगर येथील भयावह हिंसक प्रकारामुळे गाठला गेला. आंदोलकांनी बसगाड्या, पोलिसांच्या गाड्या, पोलिसांचे निवारा केंद्र पेटवून दिले. अनेक पोलिस कर्मचारी, अधिकारी यामध्ये जखमी झाले. शांततामय मार्गाने यापूर्वी जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन झाले होते.

परंतु समाजाकडे केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम आताच्या हिंसक आंदोलनामध्ये दिसू लागले आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून आपल्याला डावलले जात आहे. याचा जबरदस्त राग समाजाच्या मनात होता. सत्ताधारी राजकारणी, प्रशासकीय यंत्रणा, पोलिसांचे गुप्तहेर खाते, स्थानिक पोलिस यंत्रणा या कोणालाच या रागाचा अंदाज आला नाही, हे चिघळलेल्या आंदोलनावरून दिसून आले आहे. नेहमीच शांततेत असलेल्या जिल्ह्यामध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेणे सर्वच दृष्टीने चिंताजनक आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी हा रोष शमविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

मराठा समाजाचे आंदोलन जोर धरत असतानाच धनगर समाजानेही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता आग्रही भूमिका घेतली असून, मोठे जनआंदोलन करण्याचे ठरविले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले मराठा आणि धनगर हे दोन समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आले आणि त्यांचे आंदोलन हिसंक होत गेल्यास प्रशासन आणि राजकारण्यांच्या दृष्टीने ही मोठी चिंतेची बाब ठरेल. त्यामुळेच प्रशासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक आणि पत असलेले राजकारणी यांनी एकत्रित येऊन आंदोलन हिंसक होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करण्याची अतिशय गरज आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हा जिल्हा आहे. त्यांनीही जिल्ह्यात शांतता निर्माण होईल आणि ती टिकेल यादृष्टीने आता पावले टाकण्याची गरज आहे. 

धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात निरनिराळी आश्‍वासने सर्वच राजकीय पक्षांनी दिलेली आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच आपले राजकारण बाजूला ठेवून हा आगडोंब शमविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.