Sat, May 25, 2019 22:48होमपेज › Pune › कोट्यवधी खर्चून केलेले भुयारी मार्ग ओस

कोट्यवधी खर्चून केलेले भुयारी मार्ग ओस

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांवर तयार केलेले भुयारी मार्ग पादचार्‍यांविना ओस पडले आहेत. भुयारी मार्गांचा वापर करण्यापेक्षा रहदारीच्या रस्त्याचाच वापर पादचार्‍यांकडून केला जात आहे. दरम्यान भुयारी मार्गांमध्ये होत असलेल्या अनुचित प्रकारांमुळे बहुतांशी भुयारी मार्गांना कुलूप लावून बंद केले आहेत. 

दिवसेंदिवस वाढतच जाणार्‍या वाहतूक कोंडीमधून वाट काढत पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातामुळे अनेकांना आपला प्राणही गमावावा लागला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि पादचार्‍यांना होणारा त्रास नाहीसा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील विविध रस्त्यांवर व रहदारीच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी मार्ग तयार केले आहेत. 

या भुयारी मार्गांची अवस्था अत्यंत वाईट असून बहुसंख्य भुयारी मार्गांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. याशिवाय भुयारी मार्गांमध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य आहे. भुयारी मार्गामध्ये आडोशाचा फायदा घेऊन केले जाणारे अनुचित प्रकार बंद करण्यासाठी शहरातील बहुसंख्या भुयारी मार्ग कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहेत. भुरट्या चोरट्यांनी भुयारी मार्गांमधील लाईट लंपास केल्याचे चित्रही बहुसंख्य ठिकाणी पाहायला मिळते. 

सातारा रस्त्यावरील भुयारी मार्ग 

बिबवेवाडी जक्शन चौकात सातारा रस्त्यांवर पादचारी आणि दुचाकींसाठी भुयारी मार्ग तयार केला आहे. बिबवेवाडीकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी बहुसंख्य दुचाकी चालकांकडून या भुयारी मार्गाचा वापर केला जातो. या मार्गाच्या बाजूलाच पादचार्‍यांसाठी वेगळ्या मार्गाची व्यवस्था केलेली आहे. मात्र पादचार्‍यांकडून या मार्गाचा फारसा वापर केला जात नाही. तसेच या भुयारी मार्गातील स्वच्छता दैनंदिन केली जात नाही. त्यामुळे जागोजागी कचरा पडलेला आहे. या ठिकाणी  उजेडासाठी लागलेल्या लावलेले बल्ब आणि ट्यूब भुरट्या चोरांनी लंपास केल्याने छताच्या वायरी लोंबकळत आहेत. अनेकवेळा या ठिकाणी दारूडे गोंधळ घालत असल्याचे दिसते. 

याच रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ करण्यात आलेल्या भुयारी मार्गाला सध्या कुलूप लावण्यात आले आहे. रस्त्याच्या पश्‍चिमेकडून पुर्वेकडे ये-जा करता येते. त्यामुळे विद्यार्थी, घरकाम करणार्‍या महिला, साई मंदिरात जाणार्‍यांकडून या मार्गाचा वापर केला जातो. स्वारगेटकडून कात्रजकडे जाणारी जी वाहने उड्डाणपुलाचा वापर करत नाहीत, त्या वाहनांचा धोका भुयारी मार्गाचा वापर करणार्‍या नागरिकांना असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भुयारी मार्गाचे कात्रजच्या बाजूकडून प्रवेशद्वार कायमस्वरुपी बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. या मार्गासाठी पालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेला नाही किंवा त्यांची साफसफाईही केली जात नाहीत. त्यामुळे ही सर्व व्यवस्था येथील जयभवानी तरूण मंडळाच्या वतीने केली जात असल्याचे सुरेश आडसुळे यांनी सांगितले. 

कर्वेनगर चौकातील भुयारी मार्ग

कर्वेनगर चौकातील भुयारी मार्ग गेली दोन महिन्यांपासून कुलूप लावून बंद असल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. या भुयारी मार्गामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले असून जागोजागी कचरा आणि कागद आहेत.