Sat, Jul 20, 2019 08:47होमपेज › Pune › देवेन शहा हत्येतील संशयित अटक

देवेन शहा हत्येतील संशयित अटक

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी 

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर प्रभात रस्ता येथील त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये येऊन गोळीबार करत हत्या करणार्‍या दोघांपैकी रवींद्र सदाशिव चोरगे (41)  याला पुणे पोलिसांच्या पथकाने जळगाव येथून अटक केली आहे. तर, दुसरा साथीदार राहुल शिवतारे याच्याबाबत पोलिसांना सुगावा लागला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.  

देवेन शहा यांच्यावर प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मागील शनिवारी (दि. 13 ) गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. हा प्रकार सायली अपार्टमेंंटमधील  सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते़  त्यावरून रवी चोरगे आणि राहुल शिवतारे यांनी देवेन शहा यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे समोर आले होते.  

रवींद्र चोरगे हा याआधी देवेन शहा यांच्याकडे कामास होता. दरम्यान, रवींद्र चोरगे व राहुल शिवतारे यांचा पौड येथील जमिनीच्या व्यवहारावरून मागील एक वर्षापासून देवेन शहा यांच्यासोबत वाद सुरू होते. पोलिसांनी केलेल्या तपासात रवींद्र चोरगे याचे मुंबईतील अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे समोर आले होते.  चोरगे व  शिवतारे हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.  रवी चोरगेवर यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तर, शिवतारेविरोधात ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल आहे़  तसेच खडक पोलिसांनी त्याला एका प्रकरणात यापूर्वी अटक केली होती. दरम्यान, दोघेही नवी पेठेतील राहणारे आहेत.  

हत्या केल्यापासून  डेक्कन पोलिस, तसेच गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी दोघांच्याही कुटुंबीयांची चौकशी केली. मात्र, त्यांना या दोघांबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर डेक्कन पोलिस व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके  या दोघांच्या मागावर होती़  मध्य प्रदेशासह इतर राज्यांमध्ये दोघांचा शोध घेण्यासाठी ही पथके रवाना करण्यात आली होती.  त्यानंतर रविवारी डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम, कर्मचारी सतीश सोनवणे, पांडुरंग जगताप, पांचाळ यांच्या पथकाने विशेष खबरदारी घेत हल्लेखोरांपैकी रवी चोरगेला जळगाव येथून ताब्यात घेतले. तर, राहुूल शिवतारे याचा सुगावा लागला असून, त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

शहांना मारायचे नव्हते, पण...

रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे दोघे त्या रात्री शहांच्या सायली अपार्टमेंटमध्ये आले तेव्हा त्यांचा उद्देश त्यांना मारायचा नव्हता. मात्र, त्यांनी शिवीगाळ केल्याने शिवतारे याने गोळी झाडली, असे चोरगेने पोलिसांना सांगितले.