होमपेज › Pune › शहा यांच्या खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत

शहा यांच्या खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी
प्रभात रस्त्यावर बिल्डर देवेंन शहा यांचा गोळ्या झाडून खून प्रकरणाचे धागेधोरे इंदोरपर्यंत असल्याची माहिती समोर आली असून, इंदोर येथील शहा यांच्या संपर्कात असणारी व्यक्ती बेपत्ता झाली असून, त्याचा ठावठिकाणा पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, डेक्कन पोलिसांनी रविवारी रवींद्र चोरगे याला जळगावमधील हॉटेलमध्ये पकडले. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना खुनामागचे ठोस कारण समजू शकलेले नाही. तर, चोरगे याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

रवींद्र सदाशिव चोरगे (वय 48, रा. अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला पोलिसांनी रविवारी अटक केली. तर, राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41, रा. वडगाव बुद्रुक) हा पसार असून, पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. 

गेल्या आठवड्यात (शनिवारी, 13 जानेवारी) बिल्डर देवेंन शहा यांना घरातून बोलवून शिवीगाळ करत गोळ्या झाडून खून करण्यात आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून रवि चोरगे व राहुल शिवतारे या दोघांची नावे निष्पन्न केली. आठ दिवसांपासून दोघांचा पुणे पोलिस शोध घेत होते. शनिवारी रवी चोरगे हा जळगावातील एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अजय कदम, सतीश चव्हाण, पांडुरंग जगताप व त्यांच्या पथकाने रविवारी के. पी. हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली. 

रवी चोरगे व राहुल शिवतारे हे इस्टेट एजंट म्हणून काम करत होते. मोठ्या लोकांना जमिनी दाखवणे आणि तो व्यवहार पार पाडण्याचे काम करत होते. त्यांना कमिशन मिळत होते. शहा यांच्या संपर्कात दोघेही होते. चोरगे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर चौकशी केली. परंतु, त्याच्याकडून अद्यापही खुनाचे ठोस कारण समजू शकलेले नाही. 

खून केल्यानंतर दोघेही भोर, महाड, खोपोली तसेच परत देहूरोड भागात फिरत होते. तेथून ते अक्कलकोट, ठाणे, मध्यप्रदेशातील इंदोर आणि  बर्‍हाणपूर येथे गेले. बर्‍हाणपूरवरून चोरगे जळगाव येथे आले. तर, शिवतारे दुसरीकडे निघून गेला. दरम्यान चोरगे याला न्यायालयात हजर केले असता त्याला 29 जानेवारीपयर्र्ंत पोलिस कोठडी देण्यात आली.

शहा यांच्या पूर्व आयुष्याची माहिती 

देवेंन शहा यापूर्वी मुंबईत रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत होते. 2004 मध्ये ते पुण्यात आले. मात्र, त्यांचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची चर्चा आहे. मुंबईतील अंडरवल्ड डॉनचे नाव सांगून शहांकडून काही व्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शहा यांच्या पूर्व आयुष्याची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

सीसी टीव्हीपासून दूरच

शहा यांच्या खुनाचे रवी चोरगेकडून पोलिसांना ठोस कारण समजलेले नाही. परंतु, दोघांकडेही पिस्तूल होते. हे पिस्तूल जप्त करण्यात आलेले नाही. दरम्यान, दोघेही खुनानंतर सीसीटीव्हीमध्ये येऊ नये, अशा पद्धतीने फिरत होते. त्यांनी एका दुकानात कपडे घेतले. परंतु, त्याही ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याची खात्री करून त्यांनी कपड्यांची खरेदी केल्याचे समोर आले आहे.

खुनाचे धागेधोरे इंदोरपर्यंत...

इंदोरमधील जमीन विक्री व खरेदी करणारी व्यक्ती शहा यांच्या संपर्कात होती. पोलिसांचे पथक इंदोर येथे त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी गेले. परंतु, ती व्यक्ती तेथून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून यात आणखी काही लोक आहेत, याचीही शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.