Tue, Apr 23, 2019 01:55होमपेज › Pune › ‘करे भी तो क्या करे...’

‘करे भी तो क्या करे...’

Published On: Apr 07 2018 1:55AM | Last Updated: Apr 07 2018 1:41AMपुणे : विजय मोरे 

देवेन शहा खूनप्रकरणी थेट पोलिस महासंचालकांनीच शहर पोलिस आयुक्तांना ठोस पुराव्यासह कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिल्याने, या खुनाचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची आज (शुक्रवार) मोठी तारांबळ उडाली. याप्रकरणात आरोपींची चौकशी नाही? ठोस पुरावा नाही? अशा परिस्थितीत ‘करे तो भी क्या करे’ अशा द्विधा मनःस्थितीत तपास अधिकारी अडकले आहेत. 

शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांचा 13 जानेवारी रोजी भर वस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. खून करून आरोपी पसार झाले होते. 

दरम्यान, शहर पोलिसांनी प्रथम रवींद्र चोरगे, राहुल शिवतारे, सोनू राठोड, सुरेंद्र पाल, शंकर नवले यांची धरपकड केली आणि त्यानंतर 22 मार्च रोजी नितीन दांगट, समीर सदावर्ते यांना गजाआड केले. विशेष म्हणजे या खून प्रकरणात एकूण तीन तपासी अधिकारी बदलले गेले. 23 मार्च रोजी सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. या सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने या सर्व आरोपींची चौकशीच तपासी अधिकार्‍यांना करता आली नाही. जमीन खरेदी विक्री प्रकरणातील सुमारे दीड कोटी रुपये दिले नाहीत, या कारणास्तव खून झाला; या प्राथमिक चौकशीपर्यंतच पोलिस पोहोचू शकले. यामागील मुख्य सूत्रधार कोण? खुनाचा मुख्य उद्देश काय? या ठोस तपासापर्यंत तपास अधिकारी पोहोचू शकले नाहीत. 

दरम्यान, पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी येत्या 5 दिवसात या खून प्रकरणातील कागदपत्रे सादर करावीत, असा आदेश अचानक दिल्याने तपास अधिकार्‍यांची त्रेधा उडाली. 

महासंचालकांनी ठोस पुराव्यासह कागदपत्रे सादर करावीत, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केल्याने, कोणताही ठोस पुरावा अद्यापपावेतो हाती नसल्याने तपास अधिकारी द्विधा मनःस्थितीत सापडले होते. त्यामुळेच आज (शुक्रवार)पोलिस आयुक्तांनी तपास अधिकार्‍यांसह मॅराथॉन बैठक घेतली. त्यामध्ये मोक्का न्यायालयाकडून आरोपींचा ताबा मिळावा म्हणून जोरदार हालचाली केल्या. त्या अनुषंगाने 7 एप्रिल रोजी या आरोपींचा ताबा मिळविण्यात त्यांना यशही आले. 

पोलिस महासंचालकांनी अचानक काढलेला आदेश, त्याचबरोबर अनेक लहान- सहान बाबतीत लक्ष घालणार्‍या पोलिस आयुक्तांचे या गंभीर गुन्ह्याकडे गांभीर्याने लक्ष नसणे यामुळे पोलिस अधिकार्‍यांमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिस महासंचालक या गुन्ह्यात कोणता आदेश देतात या बद्दलही तपास अधिकारी चिंतीत आहेत.

 

Tags : pune, pune news, Deven Shah murder case, investigated,