Fri, May 24, 2019 07:13होमपेज › Pune › तळजाईप्रमाणे धानोरी टेकडीचा विकास

तळजाईप्रमाणे धानोरी टेकडीचा विकास

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:27AMविश्रांतवाडी : वार्ताहर

पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरी येथील वनक्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. धानोरी वनक्षेत्रामध्ये सुमारे दहा ते बारा हेक्टर जमिनीवर नागरी उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे. धानोरी परिक्षेत्रातील गावांमध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून दूरचे पर्यटक यावेत, मोठ्या संख्येने लोकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा म्हणून तळजाई टेकडीप्रमाणे धानोरी टेकडी विकसित केली जाणार आहे.

धानोरी गाव समुद्र सपाटीपासून 549 मीटर उंचीवर आहे. पुणे शहरालगत व लोहगाव विमानतळापासून अवघ्या 14 कि.मी. अंतरावर आहे. धानोरी गावास निसर्गाची अनमोल देणगी आहे. येथील 969.7207 हेक्ट भौगोलीक क्षेत्रापैकीे 71.66 हेक्टर क्षेत्र राखीव वनाखाली आहे. या राखीव वनाच्या तीनही बाजूने भारतीय आर्मी (मिलिटरी)  चे क्षेत्र असल्याने वनक्षेत्राला एकप्रकारचे संरक्षण कवच निर्माण झाले आहे. येथील वन हे आर्द्र व पानगाळीचे वने या प्रकारामध्ये येते. शहरालगतच निसर्गरम्य असलेल्या वन क्षेत्रात आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम करणे, वॉकींग करणे आदी बाबत आकर्षण दिसून येते. त्यामुळे वनक्षेत्राचे संवर्धन व संगोपन करणे ही काळाची गरज ओळखून पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरी येथील वनक्षेत्र विकसित केले जाणार आहे. 
निसर्ग पर्यटनाचे जाळे विकसित करताना संरक्षित क्षेत्रे, जैवविविधता असलेली वनसंपदा क्षेत्र, पाणस्थळे, जलप्रपात, दुर्ग, गिरीस्थाने यास प्राधान्य देण्यात यावे. 

या स्थळांजवळ यशस्वी संयुक्त वनव्यवस्थापनाची कामे, रोपवन क्षेत्रे, रोपवाटीका, प्रिझरव्हेशन प्लॉट, धार्मिक ठिकाणे व आदिवासी क्षेत्रातील सांस्कृतिक विविधता या बाबींचा देखील अंतर्भाव पर्यटकांचे पसंतीनुसार ठरविण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक रहिवाशाी पर्यटकांना मार्गदर्शन, सामानवाह आणि पर्यटकांना सहाय्यक कामे करू शकतील. त्याचप्रमाणे हस्तकला, वनऔषधी व तत्सम स्थानिक कलाविष्कार सादर करू शकतील. 

पर्यटनात विविध उपक्रमांचा अंतर्भाव करणे

निसर्ग पर्यटन उपक्रम राबविताना व्यवसायिक तथा कुटुंब संस्थेतील समुह, विद्यार्थी समुह, वन्यजीव प्रेमींचा समुह, विदेशी पर्यटकांचा समुह अशी वेगवेगळी पॅकेजस तयार असावीत. या विभिन्न 
समुहाकरिता त्यांना लागणार्‍या सोयी-सवलती उपलब्ध करून दिल्यास समाजातील सर्व स्तरावरील लोक या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील, याचा देखील विचार केला जाणार आहे.  धानोरी परिक्षेत्रातील गावांमध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून दुरदुरचे पर्यटक यावेत, मोठ्या संख्येने लोकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा म्हणून पुणे महानगरपालिका व वन विभागाच्यावतीने पर्यटन विकास करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी धानोरी वनपरिक्षेत्रामध्ये येणार्‍या गावांमध्ये मोकळ्या जागा व मैदाने पाहून त्यासाठी छोट्या पर्यटकांसाठी बालोद्याने तयार करून त्यामध्ये खेळणी, लॉन, पाणी व्यवस्था इत्यादी सोयी-सुविधा करण्याचा विचार आहे. तसेच वेगवेगळया प्राण्यांच्या प्रतिकृती, फुले विकसित केली जाणार आहेत.