Sun, May 26, 2019 09:16होमपेज › Pune › देवदासी प्रथेविरोधी कायद्याबाबत शासन उदासीन

देवदासी प्रथेविरोधी कायद्याबाबत शासन उदासीन

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी

देवदासी प्रथा ही सीमावर्ती भागात मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमांवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. शासनाकडून देवदासी प्रथेविरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याची अंमलबजाणी होत नाही. यावरून देवदासी कायद्याबाबत शासन उदासीन असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. या संदर्भातील तक्रार आम्ही महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या जातपंचायतविरोधी कायद्याचे स्वागत करण्यासाठी सात एप्रिल रोजी स्वागत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे उपस्थित होते. 7 एप्रिल रोजी आयोजित स्वागत परिषदेत विधानसभेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. सुप्रिया सुळे, आ. नीलम गोर्‍हे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित राहणार असून, ही परिषद मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी पाटील म्हणाले, पूर्वी जातपंचायतविरोधी कायदा अस्तित्वात नव्हता, त्यामुळे अंनिसच्या वतीने मसुदा तयार करून गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार 3 जुलै 2017 रोजी जात पंचायतविरोधी कायदा मंजूर करण्यात आला. त्या कायद्यांतर्गत 20 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहे;. पण हा कायदा बाधित लोकांपर्यंत पोहोचावा, सर्वसामान्यांना त्याची माहिती व्हावी, याकरिता स्वागत परिषदेचे आयोजन केले आहे. तसेच देवदासीसंदर्भातील जटा निर्मिती आणि जटा निर्मूलन करण्यासाठीदेखील प्रबोधन झाले पाहिजे. त्यासाठीसुध्दा शासनाने पाऊल उचलायला हवे. अंनिसच्या कार्यकर्त्यांकडूनदेखील अनेक महिलांच्या केसातील जटा काढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कंजारभाट प्रकरणातील पीडित तरुणांना अंनिसचा पाठिंबा

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात कंजारभाट समाजातील दोन तरुणांना समाजाविरोधी भूमिका घेण्याचा आरोप करीत मारहाण झाली होती. त्यांनी आमच्या पत्नी कौमार्यभंगाची परीक्षा देणार नाहीत, असे जातपंचायतीला ठणकावून सांगितले होते. त्यामुळे त्यांना मारहाण झाली. याउलट जातपंचायतीच्या ठेकेदारांनी प्रशासनाच्या मदतीनेसुध्दा त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्याविरोधात आम्ही अंनिसच्या वतीने त्यांना पाठिंबा देत असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

 

Tags : pune, pune news, Devadasi, law, implemented,