Sun, Jul 21, 2019 00:10होमपेज › Pune › नदीसंवर्धन प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावा

नदीसंवर्धन प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावा

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील मुळा-मुठा नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या नदीसंवर्धन (जायका) प्रकल्पाचे संथगतीने सुरू असलेले काम वेगाने सुरू करण्याच्या सूचना स्थायी समितीने मंगळवारी प्रशासनाला दिले. या वेळी स्थायीने यासर्व प्रकल्पाच्या कामाचा आढावाही यावेळी घेतला. 

शहरातून वाहणार्‍या मुळा-मुठा नद्यांत शहरातील तयार होणारे सांडपाणी सोडले जात असल्याने या नद्यांना गटाराचे रुप आले. नद्यांचे हे चित्र पालटण्यासाठी आणि त्यामधील प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने केंद्र शासनाच्या मदतीने नदी संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी जपानच्या जायका या कंपनीने 950 कोटींचे अनुदान मंजुर केले आहे. मात्र, तब्बल दोन वर्ष झाले हा निधी मंजुर होऊनही केवळ केंद्राकडून योजनेसाठी सल्लागार नेमला नसल्याने या योजनेचे काम रखडले होते. याबाबत दै. पुढारीने सातत्याने पाठपुरावा करून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. स्थायी समितीच्या बैठकित मंगळवारी या प्रकल्पाचे कामाचे सादरीकरण अधिक्षक अभियंता व्ही.जी.कुलकर्णी यांनी केले.

नदीच्या दोन्ही बाजुंच्या काठांवर मैलापाणी वाहिन्यांची निर्मितीचे सर्वेक्षण आणि डिझाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाचे काम करणार्‍या ठेकेदारांच्या पात्रता निकषाबद्दलची कागदपत्रे जायकाला पाठविण्यात आल्याचे तसेच बाणेर येथे उप मैलापाणी वाहिन्यांची 43 किलोमीटर चे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तसेच मत्स्यबीज केंद्र , मुंढवा, भैरोबा. मैलाशुध्दीकरण केंद्राचे  सर्वेक्षण पूर्ण झाले आहेवडगाव, वारजे बोटॅनिकल गार्डन, बाणेर,  खराडी मैलापाणी शुध्दीकरणासाठी जमीन संपादनाचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कुलकर्णी यांनी यावेळी दिली. दरम्यान एनआरसीडीकडून या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 57 कोटी 74 लाख रुपये मिळाले आहेत त्यामधील 27 कोटी 53 लाख रुपये खर्च झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या कामास याआधीच उशिर झाला असल्याने आता वेगाने मार्गी लावून वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना स्थायी समिती सदस्यांनी यावेळी केल्या.