Thu, Apr 25, 2019 21:26होमपेज › Pune › रस्त्याच्या कामामुळे मांजरीकरांचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे मांजरीकरांचा खोळंबा

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:27AMमांजरी : वार्ताहर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महादेवनगर - मांजरी बुद्रुक काँक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, गेली काही दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्याने मांजरीकरांचा खोळंबा होत आहे. अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या नियोजनशून्य कार्यपद्धतीमुळे मांजरी बुद्रुकमधील नागरिकांची गैरसोय होत आहे.

पूनावाला ग्रुपच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलीटी (सीएसआर) च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र काम करत असताना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन अद्यापही केले नाही.अधिकार्‍यांनी वारंवार सांगितल्यानंतरही ठेकेदाराने येथे पर्यायी रस्ता उपलब्ध करून त्यावर सूचना लावल्या नाहीत. दुभाजकाच्या जागेवर माती आणि मोकळे दगड पडले आहेत. रात्रीच्या वेळी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहण्याची व्यवस्था केली नाही.

सध्या नवरत्न कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू आहे. येथे पिण्याच्या पाण्याची लाईन असून तिला कव्हर करण्यासाठी गेली 10 - 12 दिवसापासून अतिशय धिम्यागतीने काम केले जात आहे. काम करत असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात घडत असून तासंतास वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.ठेकेदार आपल्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार काम करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. हा सर्वात महत्वाचा रस्ता असल्याने मोठया प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. सुमारे 25 कोटींच्या कामात नियोजन आणि दर्जा यावर भर देणे आवश्यक असताना तसे येथे दिसत नाही.

आज रस्त्याच्या कामासाठी मुरुमाऐवजी माती मिश्रित राडारोडा टाकण्यात येत होता ,मात्र एका जागरूक नागरिकामुळे तो प्रकार लक्षात आला. याशिवाय पिण्याच्या पाण्याची लाईन फुटलेली असतानाही ती बुजवण्याचा प्रयत्न या नागरिकामुळे थांबला.दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नकुल रणसिग यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले ठेकेदाराने रस्त्याच्या कामात मुरूम वापरावा असाच सूचना आहेत. रस्त्याच्या कामात मुरूमच वापरला जात आहे, जर माती मिश्रित राडारोडा वापरला जात असेल तर तो काढून टाकण्यास सांगितले जाईल.

अधिकार्‍यांच्या सूचनेकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष का? 

महादेवनगर कॉर्नर ते जुना कालवापर्यंतचा एकतर्फी रस्ता काही प्रमाणात बंद असल्याने या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असते. रस्त्याच्या कामाचे नियोजन नसल्याने ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराची माहिती, कामाचा कालावधी, एकूण खर्च, सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकार्‍यांचे नाव असा कामासंबंधी तपशिलाचा फलक लावण्यात यावा, याबाबत अधिका़र्‍यांनी सांगितले असताना अद्यापही ठेकेदाराने लावल्याचे दिसत नाही . याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाकडे ठेकेदाराने कानाडोळा केल्यानेच वाहतूक कोंडी आणि काम संथपणे सुरू असल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.