Sat, Jul 20, 2019 13:20



होमपेज › Pune › मेट्रो स्टेशनच्या बीमची किवळेत निर्मिती

मेट्रो स्टेशनच्या बीमची किवळेत निर्मिती

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 12:12AM



पिंपरी : प्रतिनिधी 

मोरवाडी, पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गावरील संत तुकारामनगर, फुगेवा डी, कासारवाडी आणि बोपोडी या 4 मेट्रो स्टेशनचे काम सुरू झाले आहेत. त्यासाठी लागणार्‍या बीम किवळे येथील कास्टिग यार्डमध्ये तयार केले जात आहेत. 

एका स्टेशनसाठी एकूण 126 आरसीसी आणि पीएससी बीम उभे केले जाणार आहेत. या मार्गावरून एकूण 9 स्टेशन आहे. त्यासाठी एकूण 1 हजार 134 बीम तयार केले जाणार असून, त्याचे काम किवळे येथील कास्टिग यार्डमध्ये सुरू आहे. तेथे तयार झालेले बीम आणून स्टेशनची जुळणी करून उभारणी केली जाणार आहे. सध्या संत तुकारामनगर, फुगेवाडी, कासारवाडी व बोपोडी या 4 स्थानकाचे काम सुरू आहे. संत तुकारामनगर स्टेशनचे एफओव्ही स्टेअर केस तयार झाले आहेत.

मेट्रो मार्गिका व स्टेशनच्या बीम व पिलर उभारणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी खडक न लागल्याने यंत्राद्वारे पायलिंग केले जाते आहे. एका मेट्रो पिलरसाठी 4 आणि स्टेशन बीमसाठी 8 पायलिंग करावे लागत आहे. त्यामुळे जमिनीखालील कामासाठी सध्या अधिक वेळ खर्ची पडत असल्याचे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

कासारवाडीतील शंकरवाडीपासून नाशिक फाटा चौकाच्या दिशेने पिलर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहेत. शंकरवाडीपासून मेट्रो उजवीकडे वळून गे्रडसेपरेटर व सर्व्हिस रस्त्याच्या दुभाजकावर येणार आहे. तेथे अडथळे ठरणारे झाडे शनिवारी (दि.12) काढण्यात आले. त्याचे दुसरीकडे पुनर्रोपण केले जाणार आहे. या कामामुळे सर्व्हिस रस्त्यावर काही काळ कोंडी झाली होती. वृक्ष पुर्नरोपणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोकडून करण्यात आलेले झाडाचे पुर्नरोपण यशस्वी झाल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. 

एका स्टेशनसाठी लागणार एकूण 126 बीम आठ स्पॅनची जुळणी पूर्ण... 
मोरवाडी पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गावर एकूण 131 फाउंडेशनचे (पाया) काम झाले आहे. एकूण 82 पिलरपैकी (खांब) 45 पिलर पूर्णपणे उभे करण्यात आले आहेत. 37 पिलर अर्धवट स्थितीत आहेत. नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टिग यार्डमध्ये एकूण 467 सेगमेंटचे कास्टिंग केले गेले आहे. खराळवाडीमध्ये पिलरवरील सेगमेंटचे 8 स्पॅनची जुळणी पूर्ण झाली आहे. सेगमेंटची तांत्रिक जुळणी 3 टप्प्यांत केली जात असून, हे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतरच पुढील स्पॅनची जुळणी केली जाते.