Fri, Apr 26, 2019 19:38होमपेज › Pune › बरखास्त होऊनही शिक्षण मंडळाच्या नावाचा उल्लेख कायम

बरखास्त होऊनही शिक्षण मंडळाच्या नावाचा उल्लेख कायम

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 12:31AMपिंपरी : मिलिंद कांबळे

मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा तक्रारी वाढल्याने सर्व महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्तीचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पालिकेतील शिक्षण मंडळ गेल्या वर्षी जूनमध्ये बरखास्त करण्यात आले. त्यास 14 महिने उलटूनही अद्याप शिक्षण समितीऐवजी मंडळ असाच उल्लेख सर्वत्र सर्रासपणे केला जात आहे. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे संताप व्यक्‍त केला जात आहे. 

पालिकेतील शिक्षण मंडळ 2 जून 2017 ला बरखास्त करण्यात आले. शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा इमारती, बाके, कपाटे, कार्यालय, दूरध्वनी, संगणक, इतर साहित्याची मालकी पालिका आयुक्तांच्या कक्षेत आणण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालिकेकडे वर्ग करण्यात आले. शिक्षण समितीचा कारभार आयुक्ताच्या नियंत्रणाखाली सुरू झाला. शिक्षण समितीची स्थापना 9 जुलैला झाली.  असे असूनही शिक्षण समितीमध्ये मंडळ असा उल्लेख अद्यापपर्यंत सर्रासपणे केला जात आहे. शिक्षण समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील फलकावर शिक्षण मंडळ अशी ठळक अक्षरातील पाटी आहे. कार्यालयातील सर्व प्रकारच्या पत्रव्यवहारामध्ये शिक्षण मंडळ असाच उल्लेख केला जात आहे. तसेच, अधिकार्‍यांच्या लेटरहेडवर मंडळ असेच नमूद आहे. होऊन गेलेल्या प्रशासन अधिकार्‍यांच्या नामफलकावर मंडळ अशीच नोंद कायम आहे. मंडळ बरखास्तीनंतर बजरंग आवारी, पराग मुंढे व सध्या ज्योत्स्ना शिंदे प्रशासन अधिकारी आहेत. मात्र, नामफलकावर मंडळाऐवजी समिती असा बदल अद्यापही केलेला नाही. तसेच, शिक्षण समितीच्या वाहनावरही मंडळ असाच जुना उल्लेख आहे.