Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Pune › कारवाई होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’

कारवाई होऊनही परिस्थिती ‘जैसे थे’

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:02AMमुंढवा : नितीन वाबळे

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जातात. त्याची तात्पुरती अंमलबजावणीही केली जाते, मात्र लगेच दोन दिवसांमध्ये ते फलक पुन्हा उभे राहतात, असा आजपर्यंतचा अनुभव असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनधिकृत जाहिरात फलकांवर ठोस कारवाई करण्याकडे मनपाचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

केशवनगर, मुंढवा, घोरपडी, बी. टी. कवडे रोड, रामटेकडी, वैदुवाडी, मगरपट्टा, साडेसतरानळी या परिसरात विद्युतखांब, झाडे, घरांच्या भिंती व उंच इमारतींवर अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत. त्यामध्ये बनावट साईनबोर्ड, तसेच साईन बोर्ड नसलेले जाहिरात फलक शोधून त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. पालिका अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो, साईन बोर्ड आहे, पण खाली पडला असेल, अशी ठोकळेबाज उत्तरे दिली जातात.

शहराचा विचार करता मनपामध्ये एकूण 1 हजार 700 जाहिरात फलकांची नोंद आहे. पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील जाहिरात फलक, पालिका हद्दीमधील नोंद नसलेले अनधिकृत जाहिरात फलक, तसेच गल्लीबोळात, प्रमुख रस्ते, चौक, अनेक दुकानांंबाहेर लावलेले बॅनर व फ्लेक्स यांचीही गणना करून त्यांची नोंदणी केल्यास पालिकेच्या महसुलात कोट्यवधी रुपयांची भर पडेल. पालिका अधिकार्‍यांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे फलकांची रीतसर नोंद होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

पालिका हद्दीत समावेश झालेल्या गावांमध्ये जाहिरात फलकांना शुल्क आकारले जात नव्हते, तसेच ज्या ठिकाणी आकारले जात होते ते नाममात्र होते. पालिकेत समावेश झालेल्या गावांमध्ये जाहिरात फलकांची संख्या मोठी आहे. त्यांची रीतसर नोंदणी करून करआकारणी केली व त्या कररूपी रकमेचा वापर या गावांच्या विकासासाठी केला, तरी या गावांचा विकास होऊ शकतो, असा उपरोधिक सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

ग्रामपंचायतीपेक्षा पालिकेचा कारभार ढिसाळ

केशवनगर ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलकावर कुठलीही करआकारणी केली जात नव्हती. दैनिक ‘पुढारी’मध्ये याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा परिषदेने येथे 10 रुपये प्रतिचौरस फूट इतकी नाममात्र करआकारणी सुरू केली होती, तरीही अनेक होर्डिंग्जधारकांनी शुल्क भरले नव्हते. पालिकेत समावेश झाल्यावर लगेच करआकारणी होईल असे वाटत होते, मात्र ग्रामपंचायतीपेक्षा पालिकेचा कारभार ढिसाळ ठरला असून, पालिकेत समावेश होऊन एक वर्ष झाले तरी केशवनगरमधील अनधिकृत होर्डिंग्जधारकांना अजून नोटिसा देणेच सुरू आहे.

बिडकर चौकातील जागेला मालकच नाही

मुंढव्यातून कोरेगाव पार्ककडे जाणार्‍या रस्त्यावरील बिडकर चौकातील ओढा अनधिकृत होर्डिंग्जधारकांचा बालेकिल्लाच बनला आहे. पालिका प्रशासन म्हणते, ही जागा आमची नाही, कॅन्टोेन्मेंटची आहे. कॅन्टोन्मेंट म्हणते, आमच्याकडे नाही लष्कर हद्दीमध्ये आहे. लष्कर म्हणते पालिका किंवा कॅन्टोन्मेंटमध्ये चौकशी करा आमच्याकडे नोंदच नाही. हद्दीच्या वादात येथे अनधिकृत होर्डिंग्ज वाढत आहेत.