Wed, Jun 03, 2020 19:01होमपेज › Pune › हरित, जल, लष्करी पद्धतीचे मेट्रो स्टेशनचे डिझाईन

हरित, जल, लष्करी पद्धतीचे मेट्रो स्टेशनचे डिझाईन

Published On: May 27 2018 1:27AM | Last Updated: May 27 2018 1:22AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात मेट्राचे काम वेगात सुरू आहे. शहरात होणारी सहापैकी पाच मेट्रो स्टेशनचे काम सुरूही झाले आहे. हे स्टेशन हरित-पर्यावरणपूरक, जल, औद्योगिक (उद्योग), लष्कर आदींच्या धर्तीवर डिझाईन केले गेले आहेत. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.

मोरवाडी, पिंपरी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत असा पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 7.15 किलोमीटर अंतर मेट्रोची मार्गिका आहे. त्यामध्ये पिंपरीतील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, वल्लभनगर एसटी आगार (संत तुकारामनगर), नाशिक फाटा चौक, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी हे सहा स्टेशन आहेत. हे सर्व स्थानक एलिव्हेटेड (उन्नत) आहेत. दापोडी वगळता सर्व पाच स्टेशनचे काम सुरू झाले आहे. वल्लनभगर स्टेशनचे फाउंडेशन तयार होऊन पिलरही उभे राहिले आहेत.

हे सर्व स्टेशन विविध संकल्पनेच्या आधारे डिजाईन करून बनविण्यात येत आहेत. पिंपरीचे स्टेशन पिंपरी-चिंचवड पालिका भवनाप्रमाणे लाकडातून तयार केलेले आयताकृती कार्यालयाच्या आकाराचे आहे. संत तुकारामनगर स्टेशन कांस्य रंगसंगतीमधील असून, त्यातून शहराचे ऐतिहासिक संबंध अधोरेखित ज्ञ करण्यात आले आहेत. नाशिक फाटा चौकातील स्टेशनला चांदीसारख्या शुभ्र रंगाची औद्योगिक झळाळी देण्यात आली आहे. त्यामुळे हे स्टेशन अंधारात चकाकणार आहे.  पाण्याचा लहरीप्रमाणे कासारवाडी स्टेशनची रचना आहे. त्यातून पाणी बचतीचा संदेश दिला आहे.

तर, फुगेवाडी स्टेशन हे झाडांच्या पानांप्रमाणे हिरवेगार रंगसंगतीमध्ये आहे. त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला आहे. तर, शहरातील शेवटचे दापोडीतील स्टेशन हे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) या लष्करी महाविद्यालयामुळे लष्कराच्या गणवेशातील खाकी व गडद हिरव्या रंगाचे असणार आहे. हे स्टेशन भारतीय लष्कराला समर्पित असणार आहे.स्टेशनला पुरस्कृत करण्यासाठी उद्योनगरीतील काही कंपन्यांशी मेट्रोने पत्रव्यवहार केला आहे. त्याच्याकडून होकार मिळाल्यास त्या स्टेशनला सदर कंपनीचे नाव दिले जाणार आहे. त्यामुळे कंपनीला प्रसिद्ध मिळणार आहे. करारानुसार काही ठराविक काळासाठी हे नाव असणार आहे. त्यात किती कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे, हे अद्याप मेट्रोने उघड केलेले नाही.