Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Pune › नगरसेवकांच्या निवडणुकीतील खर्चाची पुन्हा माहिती द्या

नगरसेवकांच्या निवडणुकीतील खर्चाची पुन्हा माहिती द्या

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

महापालिका निवडणूकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी किती खर्च केला आणि या खर्चाची आकडेवारी निवडणूक विभागास कधी सादर केली, याची माहिती सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले आहेत.  

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणूका पार पडल्या. निवडणूक निकालानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांनी त्यांच्या खर्चाची आकडेवारी निवडणूक विभागास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार या उमेदवारांना 23 मार्च 2017 पर्यंत आपला निवडणूक खर्च सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. महापालिका निवडणूकीत असलेल्या सुमारे 1102 उमेदवारांपैकी सुमारे 1100 उमेदवारांनी आपली माहिती सादर केलेली होती. निवडणूक विभागाकडून हा खर्च निवडणूक आयोगास पाठविला जातो. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा खर्च आयोगास यापुर्वीच सादर केलेला आहे.

तसेच निवडणूकीचा खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची माहितीही विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने महापालिकेकडून निवडून आलेल्या म्हणजेच नगरसेवकांनी निवडणूकीत केलेल्या खर्चाची  माहिती मागविली आहे. निवडणूक आयोगाने पुन्हा खर्चाची माहिती मागविल्याने वेगवेगळ्या चर्चां सुरू झाल्या आहेत.  पुणे महापालिकेसह राज्यातील तब्बल सतरा महापालिकेकंडून निवडणूक आयोगाने ही माहिती मागविली होती. 

क्षेत्रिय कायालयांकडून मागविली माहिती 

निवडणूक आयोगाने मागविलेल्या माहितीत उमेदवारांनी निवडणूकीचा खर्च 30 दिवसांच्या आत सादर केला का, तो नक्की कोणत्या दिवशी तो सादर केला याची याची सविस्तर माहिती मागविली आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणूक विभागाने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पत्र पाठवून तातडीने उमेदवारांच्या खर्चाचा तपशील पुन्हा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.