Sun, May 26, 2019 15:48होमपेज › Pune › वंचित बहुजन आघाडीची डॉ. आंबेडकरांची घोषणा

वंचित बहुजन आघाडीची डॉ. आंबेडकरांची घोषणा

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 1:14AMपुणे :

वंचित बहुजन आघाडीची घोषणा करत, या आघाडीच्या वतीने 27 जून ते 14 ऑगस्ट या कालावधीत 53 संघटनांसह राज्यव्यापी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले असून, हा दौरा कोल्हापूर येथून सुरू होणार आहे. या दौर्‍यादरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये परिषदा घेऊन शेतकर्‍यांचे प्रश्न, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्र आणि राज्य शासनाची चुकीची धोरणे याबाबत जनजागृती करण्यात येणार  आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, हरिभाऊ बधे, प्रा. किसन चव्हाण व विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, राज्यातील ज्या पुरोगामी विचारांच्या पक्षांना आमच्यासोबत यायचे आहे, त्यांच्यासाठी आमची दारे खुली आहेत. जागावाटप आमच्या म्हणण्यानुसार झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागा आम्ही लढवू.

पवारांना प्रतिगामी मानत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही प्रतिगामी मानत नाही. मात्र, त्यांनी उचललेली बहुतेक पावले प्रतिगामी स्वरूपातील आहेत. पवार हे पुरोगामी आहेत, पण मध्येच ते दुसर्‍या वाटेने जातात, त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत त्यांचा विचार आम्ही करत नाही. पवारांनी फुले पगडीचा केलेला स्वीकार आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे धर्मवादी पक्षांसोबत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रतिगामी मानतो, त्यांचा आणि पुरोगामीचा तसा संबंध राहिलेला नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.