Sat, Jul 20, 2019 21:47होमपेज › Pune › संत सोपानकाकांच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान  

संत सोपानकाकांच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान  

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 1:36AMसासवड : जीवन कड  
  
‘माझिया वडिलांची मिरासिगा देवा
तुझी चरणसेवा बा पांडुरंगा’ 

हा अभंग होऊन दुपारी ठीक 12.30 वाजता संत सोपानकाकांच्या पालखीची एक मंदिर प्रदक्षिणा होऊन उत्तरेकडील दरवाजातून हा सोहळा ठीक 1 वाजता पंढरीसाठी बाहेर पडला. यावेळी हजारो भाविकांनी माउली व सोपानकाकांचा जयघोष आणि फुलांची उधळण केली. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी मंगळवारी (दि. 10) सासवडवरून उत्साही वातावरणात पांगारे गावाकडे प्रस्थान झाले. 

मंगळवारी आषाढ बारस व सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थानदिन असल्याने मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी झाले. त्यानंतर पहाटे 5 वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी 11 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांच्या मानाचे अभंग झाले. याचदरम्यान मानकरी आण्णासाहेब केंजळे महाराज, देवस्थानचे प्रमुख गोपाळ गोसावी, सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणा मंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँक व सासवड नगरपालिका यांच्या वतीने सर्व दिंडी प्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. सोपानकाका बँकेच्या वतीने अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते प्रत्येक दिंडीस तुलसी वृंदावन, श्रीफळ व महावस्त्र देण्यात आले. दुपारी 2.30 च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखीचा पहिला मुक्काम पांगारे या गावी आहे.