Sun, Jul 21, 2019 08:11होमपेज › Pune › डेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाही वाढला

डेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाही वाढला

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 1:14AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

डेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाचेही शहरात रुग्ण वाढत आहेत. यावर्षी 884 रुग्ण सापडले असले तरी त्यामुळे अद्याप एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. मात्र डेंग्यू आणि चिकुनगुनिया या दोन्ही विषाणूंचा वाहक एकच प्रकारचा डास असल्याने त्यांचा परस्पर संबंधामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन्ही आजार शहरात ठाण मांडून आहेत. 

चिकुनगुनिया हा विषाणूजन्य आजार असून अरबो व्हायरसमुळे होतो आणि एडिस इडिप्ती या डासांपासून पसरतो. चिकुनगुनिया झालेल्या रुग्णाला जर या डासाची मादी चावली तर ती मादी विषाणूंनी बाधित होते. यानंतर ती दुसर्‍या निरोगी व्यक्तीला चावल्यास त्याची बाधा त्या निरोगी व्यक्तीला होते. डास चावल्यापासून 3 ते सात दिवसांनी चिकुनगुनियाचे लक्षणे दिसू लागतात.

यावर्षी जानेवारीत 36, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रत्येकी 17, एप्रिल 10, मे चार, जून सात, जुलैपर्यंत 28 रुग्ण सापडले. मात्र ऑगस्ट महिन्यापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण वाढले. ऑगस्टमध्ये 128, सप्टेंबर 140, ऑक्टोबर 262, नोव्हेंबरमध्ये 217 तर डिसेंबरमध्ये 17 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लक्षणे आणि उपाय

यामध्ये प्रामुख्याने ताप येणे, हुडहुडी भरणे, डोके दुखने, मळमळ होणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तीव्रसांधेदुखी आणि अंगावर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात. मात्र हा आजार झाल्यानंतर दीर्घकाळ अगदी सहा महिन्यांपर्यंत सांधेदुखी दिसून येते. त्यामुळे रुग्णाला दीर्घकाळ सांधेदुखीवरील औषधे घेण्याची आवशकता पडते. डेंग्यूप्रमाणेच या आजाराला विशिष्ठ असा औषधोपचार उपलब्ध नसून लक्षणानुसार उपचार आणि वेदनाशामक औषधे आणि आराम करणे फायद्याचे ठरते. केवळ डासांपासून बचाव करणे हाच एकमेव प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शिकांमध्ये म्हटलेले आहे.