होमपेज › Pune › जनरल प्रॅक्टिशनर्स व लॅबकडून डेंग्यू रिपोटिर्र्ंगला ठेंगा

जनरल प्रॅक्टिशनर्स व लॅबकडून डेंग्यू रिपोटिर्र्ंगला ठेंगा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

खासगी डॉक्टर आणि प्रयोगशाळा यांनी त्यांच्याकडे आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक असताना, ते करीत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहरात किती डेंग्यू रुग्ण आहेत, याचा नेमका आकडा समोर येत नाही. पण, ‘आयएमए’ आणि ‘जीपीए’ या डॉक्टरांच्या संघटनांनी त्यांचे सर्व सभासद डॉक्टर रिपोर्टिंग करीत असल्याचा दावा केला आहे. 

डेंग्यू रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी खासगी डॉक्टर व लॅबकडून पाच हजार 767  रुग्ण कळविण्यात आले. मात्र, महापालिका या रुग्णांना संशयित रुग्ण समजते. तर, कमला नेहरू, ससून, नायडू रुग्णालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था या शासकीय लॅबकडून पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांनाच ‘पॉझिटिव्ह रुग्ण’ असल्याचे संंबोधित करते. असे आतापर्यंत दीड हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

गेल्या वर्षी राज्य शासनाने डेंग्यू हा कीटकजन्य आजार ‘नोटिफायेबल डिसीज’ म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार खासगी डॉक्टर, लॅब यांनी यांच्याकडे आढळणारे डेंग्यूचे रुग्ण हे महापालिकेला कळविणे बंधनकारक आहे. पण सर्व डॉक्टर, लॅब हे रिपोर्टिंग करीत नसल्याने रुग्णांची आकडेवारी अनेक पटींनी मोठी आहे. 

शहरात सुमारे दहा हजारांच्या आसपास क्‍लिनिक्स, तर 498 लॅब आहेत. सध्याच्या घडीला प्रत्येक डॉक्टर्स अर्थात जनरल प्रॅक्टिशनर्सकडे दररोज किमान एक किंवा दोन डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. पण महापालिकेकडे आतापर्यंत केवळ 5 हजार 767 रुग्णांचेच रिपोटिर्ंंग झालेले आहे. यावरून डॉक्टर व लॅब यांच्याकडून प्रतिदिवशी महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाला रिपोर्टिंग होत नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.