Mon, Mar 25, 2019 05:28
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › प्लास्टिकबंदीमुळे कागदी पिशव्यांना मागणी 

प्लास्टिकबंदीमुळे कागदी पिशव्यांना मागणी 

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:53AMपिंपरी :पूनम पाटील

महाराष्ट्र सरकारने पॉलिथीन बॅगवर तसेच प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतल्याने प्लास्टीक उद्योगाशी संबंधित अनेक घटक प्रभावित झाले आहेत. मात्र, यामुळे कागदी व कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे. काळाची पावले ओळखून अनेक महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून कागदी व कापडी पिशव्या बनवण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे.   मोशी, भोसरी, चिंबळ्ी फाटा,  पिंपळे गुरव, स्पाईन रोड परिसरात जवळपास 200 हून अधिक महिलांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून, आज अनेक महिला यामुळे आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. 

कचरा विल्हेवाटीसाठीही फायदेशीर 

प्लास्टीक बंदीबाबत समाजात जागृती निर्माण झाली असून यामुळे कागदी पिशव्यांना मागणी वाढली आहे. सोसायट्यामंध्येही पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने घरोघरी खाकी पेपर दिला जात आहे. डायपर्स व सॅॅनिटरी नॅपकीन यांची कचर्‍यात योग्य विल्हेवाट लागावी यासाठी पेपर बॅग दिल्या जात आहेत. यासाठी खाकी पेपरवर लाल राउंड मार्क दिला जातो. ज्येष्ठांच्या  डायपर्ससाठीही या बॅग देण्यात येत असून कचरावेचकांना हा कचरा सहज विलग करता येतो. त्यामुळे या बॅगलाही अधिक मागणी वाढली असून अनेक महिलांनी रोजगाराचे साधन मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

दिवसाला साडेतीनशे पिशव्या बनवण्याचे लक्ष्य

कागदी पिशव्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच असून दिवसाला एक महिला साडेतीनशे कागदी पिशव्या बनवत असून असून महिन्याकाठी दीड लाख पिशव्या बनवण्याचे टार्गेट आहे. त्या दृष्टीने बचतगटातील महिला रात्रंदिवस कष्ट करुन हे काम पूर्ण करणार असल्याचा विश्‍वास   बचतगटातील महिलांनी व्यक्त केला.

Tags : Pimpri, Demand,  paper, bags, plastic, ban