Thu, Jul 18, 2019 02:27होमपेज › Pune › आकाश मिसाईलला परदेशात मागणी 

आकाश मिसाईलला परदेशात मागणी 

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 1:24AMपुणे ः प्रतिनिधी

स्वदेशी बनावटीची ‘आकाश मिसाईल’ची उपयुक्तता अधिक असल्याने इतर देशांनी तिची मागणी केली आहे. जमिनीवरुन हवेत मारा करु शकणारे मध्यमवर्गीय गटातील ही मिसाईल अनेक देशांसाठी हवी असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) चेअरमन डॉ. एस. क्रिस्टोफर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. 

डिफेन्स इन्सिस्टयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) या तंत्रशिक्षण देणा-या संस्थेच्या दहाव्या दिक्षांत समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. क्रिस्टोफर बोलत होते. यावेळी या कार्यक्रमास डीआयएटीच्या कुलगूरू डॉ. हिना गोखले व संस्थेचे विविध विभागाचे प्रमुख फॅकल्टी उपस्थित होते. यावेळी  इंजिनिअरिंग, नेव्ही, एरोनॉटीक्स या शाखेतील विद्यार्थ्यांना डॉ. क्रिस्टोफर यांच्या हस्ते पदवीदान करण्यात आली. तसेच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. तसेच आयआयटी खरगपुरसह देशातील नामांकित संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘डरूस’ प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. 

यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आकाश मिसाईलची अनेक देशांनी भारताकडे  खरेदीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप संबंधित देशांसोबत चर्चांची बैठक सुरु असल्याने त्यासंर्दभात अधिक तपशील आत्ताच देता येणार नाही असे स्पष्ट केले. तसेच तिची औद्योगिक दृष्टया रोबोटिक वापराच्या अनुषंगाने चाचण्या करण्यात येत असून अद्याप त्याच्या सिध्दतेची पडताळणी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. 

देशाचे लष्करी सामर्थ्य वाढावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जमीन आणि हवेतील मानव विरहित उपकरणांचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आप्तकालीन परिस्थितीत मनुष्यहानी टाळली जावी  याकरिता रोबोटिक तसेच कृत्रिम बुदिधमत्ता संबंधित संशोधनास प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय लष्करात सध्या ‘इन्सास’ शस्त्रे मोठे प्रमाणात वापरली जात असून अत्याधुनिक छोटी शस्त्रे विकसित करण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.  छोटी शस्त्रे विकसित करण्याकरिता खासगी कंपनीना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अद्याप लायस्नस दिली जात नाहीत. मेरिटाईम लॅब, निर्भया युध्दनौका अशा विविध गोष्टींची बांधणी संर्दभात ‘डीआरडीओ’ मार्फत सध्या काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तीन प्रकल्पांची निवड

डीआरडीओ तर्फे डीआरडीओ रोबोटिक्स अ‍ॅण्ड अनमॅनड सिस्टीम एक्सपोझिशन (डरुस-2018) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले होते. यामध्ये एक हजारांपैकी 30 उत्तम प्रकल्पांची निवड करुन त्यांचे प्रदर्शन डीआयएटी येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्वोत्तम प्रकल्प म्हणून केरळ मधील मल्लपुरम येथील एमईएस कॉलेज ऑफ इंजिनअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सैनिकांना मार्गदर्शक असलेल्या ‘आयुध’ वाहनाची निवड करण्यात आली. या प्रकल्पाला डीआरडीओचे चेअरमन एस. क्रिस्तोफर यांच्या हस्ते दीडलाख रुपयांचा चेक व सन्मानचिन्ह देण्यात आले. तर दुसर्‍या क्रमांकावर आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बहुमजली इमारत टेहाळणी कॅमेर्‍याची निवड करण्यात आली. त्यांना एक लाख रुपयांचा चेक यावेळी प्रदान करण्यात आला. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आप्तकालीन परिस्थितीत वापरासाठी तयार केलेल्या कॉमप्रेसड एअर पॉवर हयुमन एक्सोस्केलेटन सूटची तिसर्‍या क्रमांकासाठी निवड करण्यात आली.