पुणे : प्रतिनिधी
राज्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी सोमवारी आपल्या विविध मागण्यांकडे सोशल मीडियातून #MPSC_STUDENTS_RIGHTS या हॅश टॅग मोहिमेतून सरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना या मोहिमेअंतर्गत टॅग केले.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या उमेदवारांनी भरतीसाठी निघणार्या कमी जागा, सेवा निवृत्तीचे वय 55 करावे,महापरीक्षा पोर्टल रद्द करावे, उमेदवारांची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घ्यावी, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही आणि जॅमर लावावे, कंत्राट पद्धत बंद करावी या मागण्यांविरोधात हे अनोखे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडियावर ही हॅशटॅग मोहीम राबवली.
एमपीएससीद्वारे घेण्यात येणार्या परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन केले. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमधून मोर्चे काढून त्यांनी त्यांच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पुणे ते मुंबई असा लॉग मार्चही या विद्यार्थ्यांनी काढला. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून ठोस पावले उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहचविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या आंदोलनाला राज्यातील अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा हॅश टॅग वापरून आंदोलनाला पाठिंबा दिला.
मोर्चे, आंदोलनांना दाद न देणार्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे उमेदवार त्यांच्या मागण्या मांडतायत. डिजीटलचा पुरस्कार करणार्या सरकारने आता डोळे उघडून त्या समजून घ्याव्या आणि लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. - धनंजय मुंडे
राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने अत्यंत तातडीने लक्ष द्यायला हवे. या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची गंभीर दखल घ्यावी. - जयंत पाटील