Sat, May 30, 2020 11:22होमपेज › Pune › मकर संक्रांतीनिमित्त ‘चिक्की’गुळाला मागणी 

मकर संक्रांतीनिमित्त ‘चिक्की’गुळाला मागणी 

Published On: Dec 31 2017 1:48AM | Last Updated: Dec 31 2017 12:33AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

मकर संक्रांतीच्या सणासाठी मार्केट यार्डातील बाजारात चिक्की गूळ व चिक्की बॉक्स पॅकिंंगला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने गुळाचे भाव प्रतिकिलोमागे 5 ते 6 रुपयांनी घसरले आहे. साखरेची भाववाढ न झाल्याचा परिणामही गुळाच्या भावावर झाला आहे. तीळ पापडी, वड्या, लाडू करण्यासाठी कारखानदार, लघुउद्योजकांप्रमाणेच गृहिणींकडून चिक्की  प्रकारच्या गुळाला पसंती दिली जात आहे. 

बाजारात गूळवडी, गुळाची पोळी, पापडी, तीळवडी त्याचबरोबर तेलबिया प्रकारातील शेंगदाणा, तीळ तसेच काजू, सुकामेवा या प्रकारासाठी चिक्की गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तीळवडी व गोड शेवसाठी पिवळ्या रंगाचा कडक गूळ; तर शेंगदाणा, खजूर, डिंक लाडूस मऊ असलेल्या गुळाची व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात येत आहे. कराड, कोल्हापूर, सांगली येथून पुण्याच्या बाजारपेठेत दहा किलोचे 500 ते 600 डाग; तर दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव येथून गावरान चिक्कीचे 100 ते 200 डाग दररोज दाखल होत आहे. कराड, पाटण, केडगाव येथून येणारी चिक्की ही चिकट व घट्ट असल्याने त्याला लाडू तयार करणार्‍यांची मोठी पसंती मिळते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात गुळाचा पुरवठा वाढत आहे.   

संक्रांतीसाठी उत्पादने तयार करताना मऊ व चिकटपणा असलेल्या ‘चिक्की’ गुळाची विक्री जास्त होते. बाजारात एक, अर्धा व पाव किलो अशा बॉक्स स्वरूपात आणि रसायनांचा वापर न केलेला गूळ उपलब्ध आहे. चांगल्या प्रतीच्या चिक्कीच्या प्रतिदहा किलोस 3 हजार 800 ते 4 हजार 200 रुपये दर मिळत आहे. त्याचप्रमाणे, एक किलो चिक्की बॉक्स पॅकिंंगच्या 18 ते 20 किलोस 3 हजार 800 ते 4 हजार 200, अर्धा किलो व 250 ग्रॅम पॅकिंगमधील प्रति वीस किलोच्या गुळास अनुक्रमे 4 हजार 300 ते 4 हजार 400 व 4 हजार 200 ते 4 हजार 500 रुपये दर मिळत आहे.