Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Pune › औषधी गुणधर्मामुळे जांभळाला मागणी

औषधी गुणधर्मामुळे जांभळाला मागणी

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 12:42AMपुणे : चवीला आंबट, गोड तसेच तुरट असलेल्या जांभळांची गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मधुमेहावर गुणकारी असलेल्या जांभळांना गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मागणी वाढत आहे. परिणामी, पूर्वी किरकोळ भावात विकल्या जाणार्‍या जांभळांना चांगले दर मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सद्यस्थितीत घाऊक बाजारात जांभळांच्या प्रतिदहा किलोस 60 ते 110 रुपये तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोस 100 ते 150 रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

जांभूळ हे मधुमेहाच्या आजारांमध्ये अधिक गुणकारी असल्याचे सांगितले जाते. याखेरीज चवदार फळ असलेल्या जांभळचा वापर हा जाम, जेली, सरबत, मध, व्हिनेगर आणि लोणच्यासाठी वापर होत असल्याने लहान मुलांसोबतच मध्यमवयीन व्यक्तींमध्ये त्याला विशेष मागणी आहे. तर काहीजण जांभळाच्या बियाही सुकवून त्याचे चूर्ण करून औषध म्हणून सेवन करतात. सद्यस्थितीत मार्केटयार्डातील फळबाजारात भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, हवेली तालुक्यासह कर्नाटकातून जांभळांची आवक वाढली आहे.

आयुर्वेदिकदृष्ट्या जांभळाचे महत्त्व

जांभळांमध्ये नैसर्गिकरीत्या असलेल्या लोहतत्त्वामुळे पांडुरोग, कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर फायदेशीर ठरतो. जांभळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व मेद, कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. ई जीवनसत्वांचा भांडार जांभळाच्या कोवळ्या पानात असतो. तर बियांमध्ये ‘ग्लुकोसाईड जांबोलिन’ हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ, त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.