Sat, Jul 20, 2019 16:00होमपेज › Pune › ‘इव्हीएम’ हटवा : लोकशाही वाचवा

‘इव्हीएम’ हटवा : लोकशाही वाचवा

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष केंद्रात इव्हीएम मशिनच्या मदतीनेच सत्तेवर आला आहे. त्यांनी देशातील विविध विधानसभा आणि इतर निवडणुकाही मशिनच्या साहाय्यानेच जिंकलेल्या आहेत. एकंदरीत भाजपची मोदी-शहा ही जोडगोळी भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सातत्याने करीत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा यांसह देशातील सर्वच क्षेत्रात भाजपचा हस्तक्षेप वाढलेला असून, त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप करत आणि ‘इव्हीएम हटवा आणि लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने इव्हीएम आणि केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन केले.  

इव्हीएम मशिनच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संयुक्तपणे धरणे आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, आमदार अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर अंकुश काकडे, प्रशांत जगताप, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेवक दीपक मानकर, सुनील टिंगरे, रवींद्र धंगेकर, सुजाता शेट्टी, भैयासाहेब जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष राकेश कामठे उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिनमध्ये फेरबदल करण्यात आल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये इव्हीएम मशिनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लोकशाही वाचविण्यासाठी इव्हीएम मशिनला हटवून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी. रमेश बागवे म्हणाले, निवडणूक काळात इव्हीएम मशिनमध्ये सेटिंग करून निवडणूक प्रक्रियेत गडबड करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. इव्हीएम मशिनद्वारे घेतल्या जाणार्‍या निवडणुकांबद्दल साशंकता वाटते.

माजी नगरसेवक दत्ता बहिरट म्हणाले, महापालिका निवडणुकीत माझ्या प्रभागात वापरण्यात आलेली इव्हीएम सील करताना केलेली सही मतमोजणीच्या वेळी नव्हती. टाकलेले नंबर बदलले होते. माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यानंतर मशिन सील करताना नजरचुकीने नंबर वेगळा लिहिला होता, असे सांगितले.