Mon, Aug 26, 2019 01:43होमपेज › Pune › नाल्यातील कचरा स्वच्छ सर्वेक्षणाला बाधक

नाल्यातील कचरा स्वच्छ सर्वेक्षणाला बाधक

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 09 2018 12:44AM
देहूरोड : उमेश ओव्हाळ


हरातून जाणार्‍या मोठ्या नाल्याचे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची केलेली घोषणा अद्यापही कागदावरच आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड या दोन्ही प्रशासनांच्या सीमेवर असलेला हा नाला प्लॅस्टिक आणि कचर्‍याच्या ढिगार्‍याने भरून गेला आहे. दोन्ही प्रशासनांनी सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतला असुनही या नाल्याच्या सफाईबाबत उदासिन आहेत. आता हा नाला स्वच्छ सर्वेक्षणातील बाधा ठरू शकेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील गांधीनगर भागातून सुरू झालेला हा नाला शिवाजीनगर, मोरबा चाळ भागातून पुढे क्‍लासिक वसाहतीपासून पालिका हद्दीलगतच्या भागातून थेट पवना नदीपात्रात जाऊन मिळतो. या नाल्यात प्रामुख्याने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सांडपाणी सोडले जाते; शिवाय पालिकेच्या हद्दीतील विकासनगर, दांगटवस्ती भागातील अनेक मोठ्या वसाहतीतून येणारे भूमिगत गटारांचे पाणीही त्यातच सोडले जाते. दोन्ही प्रशासनांच्या हद्दीतील सांडपाण्यासह कचरा आणि प्लॅस्टिकही मोठ्या प्रमाणात या नाल्यातून वाहत येते. 

या कचर्‍यामुळे पवनेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होत असली तरी या दोन्ही प्रशासनांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलत या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच कात्रज बाह्यवळणमार्गाचे सहा पदरीकरण तसेच शेजारून सेवारस्त्याचे काम करण्यात आले. या कामामुळे या नाल्याचा मुळ प्रवाह अडविला गेला आहे. त्यामुळे नाल्याची रूंदी कमी झाली असून शेजारच्या सुपीक शेतजमीनीत हे पाणी घूसू लागले असल्याच्या येथील शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. याशिवाय बाह्यवळण मार्गाच्या या भागात प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दर्शनी भागातील दुर्गंधी व अस्वच्छतेचे हे दृश्य स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणार्‍या तसेच स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेऊन बक्षिसाचे स्वप्न पाहणार्‍या दोन्ही प्रशासनांच्या कारभार्‍यांना त्रासदायक ठरू शकेल. 

त्यामुळे हा परिसर प्राधान्याने स्वच्छ करून घ्यावा त्याचप्रमाणे हा नाला बंदिस्त करून घ्यावा, अशी मागणी  होऊ लागली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात दोन्ही प्रशासन सहभागी असल्यामुळे या मागणीचा विचार करण्याची वेळ आली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ करतेय तरी काय?

शहरातून वाहणारा हा प्रमुख नाला कधीकाळी स्वच्छ पाण्याचा नैसर्गिक ओढा होता. कॅन्टोन्मेंट बोर्डाने 1997 च्या सुमारास त्याला दोन्ही बाजुंनी भिंत बांधून नाल्याचे स्वरूप दिले. त्यानंतर डागडुजी न झाल्यामुळे हे बांधकाम अनेक ठिकाणी कोसळले आहे. मागील दशकभरात पालिका हद्दीत नाल्यालगत अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. त्यांचे सांडपाणीही या नाल्याला जोडण्यात आले. शिवाय विकासनगर, एम.बी.कॅम्प परिसरातून टाकण्यात आलेली भूमिगत गटारे या नाल्यालाच जोडण्यात आली. त्यामुळे या नाल्यातून दिवसाकाठी हजारो लिटर सांडपाणी आणि कित्येक टन कचरा वाहुन थेट पवना नदीपात्रात मिसळत आहे. या नाल्यापासून जवळच असलेल्या बोर्डाच्या कत्तलखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली. मग हा नाला आणि पवनेचे प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिसले नाही का? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.