Mon, Apr 22, 2019 04:12होमपेज › Pune › अवघ्या दीड तासात ३१ विषय मंजूर

अवघ्या दीड तासात ३१ विषय मंजूर

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:27PM

बुकमार्क करा
देहूरोड : वार्ताहर 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची मंगळवारी सायंकाळी झालेली सर्वसाधारण बैठक मॅरेथॉन बैठक ठरली. अवघ्या दीड तासात विषयपत्रिकेवरील सुमारे 31 विषयांसह ऐनवेळच्या जवळपास 11 विषयांवर चर्चा झाली. यातील बहुसंख्य विषय मंजूर करण्यात आले. ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव अध्यक्षस्थानी होते.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला असून, सध्या शहराच्या स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे मंगळवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. या बैठकीत 100 नवीन बाक, 50 नवीन कचराकुंड्या, तसेच दोन वाहनांवर मैलाटाक्या बसविणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये झालेल्या स्वच्छता ही सेवा आणि त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत झालेल्या अनेक कामांच्या खर्चाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजी मलंग मारिमुत्तू, गोपाल तंतरपाळे, ललित बालघरे, अ‍ॅड. अरुणा पिंजण, तसेच लष्करी सदस्य कर्नल राजीव लोध आदी उपस्थित होते. मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे बोर्डाने विविध पदांवर तात्पुरत्या सेवा करारानुसार कामगार भरती केली आहे.

यातील निवड झालेल्या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. भाजी मंडई येथे बोर्डाची जुनी इमारत मोडकळीस आली असून, या इमारतीतील गाळे खाली करण्यासाठी बोर्डाने संबंधित व्यापार्‍यांना यापूर्वीच नोटीस बजावल्या आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या या कारवाईनंतर संबंधित गाळेधारकांकडून बोर्डाला भाडे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आता निर्वाणीचा इशारा देऊन ही धोकादायक इमारत पाडण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी मांडला. त्यावर संबंधित गाळेधारकांना काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी विशाल खंडेलवाल यांनी केली. मात्र, या मागणीला कर्नल लोध यांनी अनाठायी ठरवत आता कारवाईच गरजेची आहे, असे स्पष्ट केले.

पथदिव्यांसाठी लवकरच नवीन निविदा काढणार गेल्या दीड वर्षांपासून बोर्डाच्या हद्दीत विविध रस्त्यांवरील पथदिवे, तसेच विविध शासकीय इमारतींवरील दिवे पुरवठ्याअभावी बंद होते. मागील दोन महिन्यांपूर्वी कंत्राटदारांमधील स्पर्धा आणि कुरघोड्यांमुळे हे काम अजूनही लांबण्याची शक्यता आहे. उपस्थित झालेल्या वादामुळे या कामाचे मागील टेंडर रद्दबातल ठरविण्यात आले असून, लवकरच नवीन टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी या वेळी दिली.